चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने गुरुवारी पश्चिमेकडील शीआन शहरामध्ये कठोर निर्बंध लागू करत लॉकडाउनची घोषणा केलीय. वुहानमध्ये दोन वर्षांपूर्वी करोनाचा सर्वात आधी प्रादुर्भाव झालेला त्यावेळी घेण्यात आलेल्या कठोर निर्णयांनंतरचा हा सर्वात मोठा निर्णय असल्याचं सांगितलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या झीरो टॉलरन्स ध्येयाचा उल्लेख करत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचं चीनने स्पष्ट केलंय. चीनमधील शीआन शहरातील नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घरातील एकाच व्यक्तीला दिवसाआड बाहेर पडण्याची मूभा देण्यात आलीय. या शहरामध्ये एक कोटी ३० लाख लोक राहतात. अगदीच अत्यावश्यक कामासाठी शहराबाहेर जाण्यास परवानगी देण्यात आलीय. मात्र त्यासाठीही सरकारकडून विशेष परवाना जारी करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय.

चीनमधील सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या सिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत असून या चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये १४ जिल्ह्यांमध्ये १२७ रुग्ण आढळून आले. करोना विषाणूचा संसर्ग हा अधिक चिंतेचा आणि गुंतागुंतीचा विषय झाल्याचा चिनी संशोधकांचा दावा आहे. त्याचदरम्यान नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त सुट्ट्या असणाऱ्या होणारा प्रवास आणि हिवाळी ऑलिम्पिक खेळांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर चीनसमोर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान आहे. फेब्रुवारी महिन्यात असणाऱ्या शीतकालीन खेळांसाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधून खेळाडू चीनमध्ये दाखल होणार आहेत.

नक्की वाचा >> “करोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदी ‘मृतदेहांचं डम्पिंग ग्राऊंड’ झालेली”; स्वच्छ गंगा मोहिमेच्या प्रमुखांचा दावा

चीन सध्या डेल्टा आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण तयारी करत असल्याचं चित्र दिसतं आहे. येथे लसीकरणाचा वेग वाढवण्यात आलाय. चीनचे उप पंतप्रधान सुन चुनलान यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात असे आदेश दिलेत. चीननमधील प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या चुनलान यांनी देशातील मुख्य शहरांमध्ये मोठ्या सभा आणि गर्दी जमण्यापासून रोखण्यासाठी तसेच प्रवासावर बंदी घालण्यासंदर्भातील निर्णयांवर जोर दिलाय.

नक्की वाचा >> ओमायक्रॉन: मोदी सरकार घेणार मोठा निर्णय? अजित पवारांनी दिले संकेत; म्हणाले, “स्वत: देशाचे पंतप्रधान…”

शीआनमधील लॉकडाउन हा तेथे स्थानिक पातळीवर होत असणाऱ्या डेल्टा संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आलाय. करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे रोखून शून्य करोना रुग्ण आढळून येतील अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी चीन अगदी लसीकरण, निर्बंध आणि इतरही सर्व मार्गांनी प्रयत्न करत आहे.

नक्की वाचा >> अमेरिकेत साडेसात लाख कोटींचा COVID-19 Relief Funds घोटाळा

शीआन शहरामधून देशभरामध्ये संसर्ग होण्याची शक्यता असल्याने गुरुवारपासून या शहरामध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या देशांतर्गत विमान सेवांवरही बंदी घालण्यात आल्याचं वृत्त चिनी प्रसारमाध्यमांनी दिलंय. असे निर्बंध एका महिन्यासाठी लागू करण्यात आल्यानंतर करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची अनेक उदाहरणं चीनमध्ये आहेत. त्यामुळेच आता शीआनमधील संसर्ग रोखण्यासाठीही हाच मार्ग निवडण्यात आलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China puts millions under lockdown after virus outbreak in xian city scsg