पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हल्ल्याचा निषेध करणारा चीन अखेर पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याच्या भारताच्या मागणीला समर्थन देण्यास चीनने नकार दिला आहे. भारताने संयुक्त राष्ट्राकडे ही जुनी मागणी आहे, मात्र दरवेळी चीन भारताच्या मार्गात अडथळे आणतं. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर चीनच्या भूमिकेत बदल होईल अशी अपेक्षा होती. मात्र चीनने आपल्या भूमिकेत बदल करण्यास नकार दिला आहे. याआधी चीनने दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शहीद जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सांत्वन व्यक्त केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३९ जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल काकापोरा येथील रहिवासी अशून त्याने स्फोटकांनी भरलेल्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली. या धडकेमुळे स्फोट झाला ज्यामध्ये जवान शहीद झाले.

सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला आणि क्षणार्धात स्फोटक भरलेला ट्रक त्या ताफ्यात धडकल्याने भीषण स्फोट झाला. त्यात ७६व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधडय़ा उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. काही वाहनांवर गोळीबाराच्या खुणा आहेत. त्यामुळे परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० कि.मी.वर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China rejects indias appeal to list masood azhar as global terrorist