China Slaps 34 Percent Tariff On US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर लादलेल्या अतिरिक्त व्यापार करामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशात आता आज चीननेही अमेरिकेतून चीनमध्ये आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर ३४% अतिरिक्त व्यापार कर लावण्याची घोषणा केली आहे. दरम्यान अमेरिकन आयातीवर हा व्यापार कर १० एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी सात दुर्मिळ पृथ्वी घटकांवर निर्यात नियंत्रणे लादली आहेत, ज्यात गॅडोलिनियम जे सामान्यतः एमआरआयमध्ये आणि यट्रियम, जे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरला जाते, यांचा समावेश आहे. पुढे, मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “चीनने जागतिक आरोग संघटनेच्या विवाद निवारण यंत्रणेअंतर्गत दावा दाखल केला आहे.”
ट्रम्प सत्तेत परतल्यानंतर चीन-अमेरिकेतील तणाव वाढला
याशिवाय, चीनने ११ अमेरिकन संरक्षण कंपन्यांनाचा अविश्वसनीय युनिट यादीत समावेश केला असून, १६ अमेरिकन कंपन्यांवर निर्यात नियंत्रणे लादण्याच्या तयारीत आहे. जानेवारीमध्ये ट्रम्प यांची पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढला आहे. अमेरिका आणि जगभरातील अनेक देशांचे व्यापार करावरून वाद सुरू आहेत. २ एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि भारतासह अनेक देशांविरुद्ध वाढीव व्यापार कर आकारण्याचा निर्णय जाहीर केला होता. याशिवाय, फेंटानिल औषधांबाबतही ट्रम्प चीनवर खूप नाराज आहेत.
अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे उल्लंघन
गेल्या वर्षी, चीनने अमेरिकेतून सुमारे १६४ अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू आयात केल्या आहेत. ज्या चार वर्षातील सर्वात कमी आहेत. “अमेरिकेचा अतिरिक्त व्यापार कर आकारण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे उल्लंघन आहे. अमेरिकेचा हा निर्णय एकतर्फी असून चीनच्या कायदेशीर हक्कांना आणि हितसंबंधांना कमजोर करत आहे”, असे चीनच्या अर्थ मंत्रालयाने अमेरिकेवर ३४% व्यापार कर जाहीर करताना एका निवेदनात म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच अनेक देशांवर अतिरिक्त व्यापार कर लादला आहे. यामध्ये भारत, चीनसह अनेक देशांचा समावेश आहे. यातील कॅनडा आणि चीनने अमेरिकेवरही व्यापार कर लादत जशास तसे उत्तर दिले आहे. पण, यामधील अनेक देशांनी यावर अद्याप उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. भारतानेही याबाबत सावध भूमिका घेत याचा अभ्यास करणार असल्याचे म्हटले.