गेल्या आठवडय़ात मलेशियाचे ‘एमएच३७०’ जातीचे विमान बेपत्ता झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा शोध घेण्याचे सर्व प्रयत्न असफल ठरल्यानंतर चीनने आता तिबेट व झिंजियांग प्रांतात या विमानाचा शोध घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या विमानातील २३९ लोकांमध्ये असलेल्या आपल्या देशाच्या प्रवाशांचा अपहरणाच्या प्रयत्नांत हात असण्याची शक्यताही चीनने फेटाळून लावली आहे.
या संदर्भात नव्याने मिळालेल्या माहितीनुसार कझाकस्तान व तुर्कमेनिस्तानच्या सीमेजवळ तसेच इंडोनेशियाच्या दक्षिणेपासून हिंदी महासागराच्या दक्षिणेकडे या विमानाचा शोध घेण्यात येईल.
मात्र हा दहशतवादी हल्ल्याचा भाग असल्याचा चीनने इन्कार केला आहे. आपल्या हद्दीतून विमान कझाकस्तान व तुर्कमेनिस्तानकडे गेल्याची शक्यता भारत व पाकिस्तानने फेटाळल्यानंतर चीनने आता त्यांच्याच देशाच्या उत्तर मार्गिकेत या विमानाचा शोध सुरब केला आहे.
दरम्यान, या विमानाच्या वैमानिकाने आत्महत्या केल्याची शक्यता मलेशियाचे विरोधी पक्षनेते अन्वर इब्राहीम यांनी फेटाळून लावली आहे. सदर वैमानिक त्यांचा नातेवाईक आहे. वैमानिकाने आत्महत्या केल्याची शक्यता तर्कास धरून नाही, असे ते म्हणाले.
या विमानाच्या शोधात २६ देश सहभागी असून उत्तर कास्पियन समुद्र ते दक्षिण हिंदी महासागरात खोलवर त्याचा शोध चालू आहे.
एअरलाइन्सचे मुख्याधिकारी अहमद जौहरी याह्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की विमानाची स्वयंचलित ट्रॅकिंग यंत्रणा कधी बंद करण्यात आली हे समजू शकलेले नाही. विमानाकडून मिळालेला शेवटचा रेडिओ संदेश सहवैमानिकाचा होता व त्यात तो ऑल राइट गुड नाइट असे म्हणाला होता. हे विमान बीजिंगला जात असताना त्याचा मार्ग संगणक प्रणालीच्या मदतीने कॉकपीटमध्ये बसलेल्या कुणीतरी बदलला, असे वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विमानातील यंत्रणा मानवी पातळीवर नियंत्रित करण्याऐवजी कुणीतरी कॉकपीटमध्ये कॅप्टनच्या गुडघ्याइतक्या उंचीवर असलेल्या संगणकावरील सात ते आठ बटणे दाबली आहेत. विमानातील या संगणकाला फ्लाइट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतात. त्याच्या मदतीने प्रत्येक क्षणाला विमानास दिशा मिळत असते. विमानाचा मार्ग उड्डाणापूर्वी बदलला की नंतर हे समजू शकलेले नाही.