नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारताच्या आर्थिक, सामाजिक प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंधात झालेल्या प्रगतीची चीनचे प्रमुख वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने प्रशंसा केली आहे. या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात नमूद केले, की स्वत:ची स्वतंत्र ओळख (भारत नॅरेटिव्ह) विकसित करण्यासाठी भारत धोरणात्मकदृष्टया आत्मविश्वासाने सक्रिय झाला आहे. चीनमधील प्रमुख प्रसारमाध्यम असलेल्या या वृत्तपत्रात भारताची अशी प्रशंसा प्रसिद्ध होणे दुर्मीळ मानले जाते.
शांघाय येथील फुदान विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे संचालक झांग जियाडोंग यांनी हा लेख लिहिला आहे. यात गेल्या चार वर्षांतील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. भारताचा उल्लेखनीय आर्थिक विकास, शहरी प्रशासनातील सुधारणा आणि विशेषत: चीनसोबतच्या आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलच्या दृष्टिकोनातील बदलाची प्रशंसा जियाडोंग यांनी केली आहे. त्यांनी नमूद केले, की चीन आणि भारतातील व्यापार असंतुलनावरील वाटाघाटीत भारतीय प्रतिनिधी पूर्वी प्रामुख्याने व्यापार असमतोल कमी करण्यासाठी चीनच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करायचे. ते भारताच्या निर्यातक्षमतेवर अधिक भर देत आहेत.
हेही वाचा >>> पंतप्रधानांकडून लक्षद्वीपमध्ये सागरतळाच्या सफरीचा आनंद; विविध छायाचित्रे प्रसृत
जियाडोंग यांनी या लेखात म्हंटले आहे, की राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारताने पाश्चिमात्य देशांच्या लोकशाहीच्या संकल्पनेचे अंधानुकरण करत राहण्याऐवजी, लोकशाहीवादी राजकारणाशी जोडलेली ‘भारतीय वैशिष्टय़े’ अधोरेखित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळेच सद्यस्थितीत भारतातून उगम पावलेल्या लोकशाहीवादी राजकारणावरच अधिक भर दिला जात आहे. हे परिवर्तन इतिहासातील वसाहतवादी छायेतून बाहेर पडण्याची तसेच राजकीय आणि सांस्कृतिकदृष्टया जागतिक स्तरावर प्रभावशाली म्हणून स्वत:चे स्थान निर्माण करण्याची भारताची महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करतो.
वेगवान धोरणात्मक बदल दुर्मीळ
भारताने नेहमीच स्वत:ला जागतिक शक्ती मानले आहे, असे या लेखात नमूद करण्यात आले आहे. तसेच भारत बहुराष्ट्रीय सत्तासंतुलन धोरणाकडून बहुराष्ट्रीय मैत्रीच्या धोरणाकडे वळला आहे. त्याला अवघी दहा वर्षेच लोटली आहेत. तरीही भारत या बहुध्रुवीय जगात एक अग्रणी सत्ता बनण्याच्या धोरणाकडे वेगाने वाटचाल करत आहे. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या इतिहासात इतका वेगवान धोरणात्मक बदल दुर्मीळ आहे. एक बदललेला, बलशाली आणि अधिक दृढ आत्मविश्वास असलेला भारत हा एक महत्त्वपूर्ण नवा भू-राजकीय घटक बनला आहे. त्याची दखल अन्य देशांनी घेणे अगत्याचे आहे, असेही शेवटी लेखकाने नमूद केले आहे.