लडाखमधील घुसखोरीप्रश्नी चीनने तसूभरही माघार तर घेतलेली नाहीच उलट भारतीय लष्करानेच दौलत बेग ओल्डी येथून आपले सैन्य प्रथम मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. चीनच्या या भूमिकेमुळे उभय देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील चौथी बैठकही निष्फळ ठरली आहे.
ब्रिगेडियर पातळीवर चुशुल येथे शनिवारी पाऊण तास झालेल्या या चौथ्या बैठकीत चीनने आपला हट्टाग्रह किंचितही सौम्य केला नाही. १५ एप्रिलला ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत १९ किलोमीटर आत घुसले आहेत. तेथे त्यांनी पाच तंबू उभारले असून ५० सैनिक व लष्करी वाहने सज्ज ठेवली आहेत. उभय बाजूंनी १५ एप्रिलपूर्वीची स्थिती ‘जैसे थे’ करावी, ही भारताची मागणी चीनने धुडकावली. भारतीय लष्करानेही चीनच्या तळापासून ३०० मीटर अंतरावर छावणी टाकली आहे. आम्ही माघारीचा विचार करण्यापूर्वी भारतीय लष्करानेच तेथून माघार घ्यावी, असा अजब पवित्रा चीनने घेतला आहे. माघारीची प्रक्रिया उभय बाजूंनी सारखीच हवी, असा बोटचेपा पवित्रा घेत आपल्याच हद्दीतून माघारीची तयारी एकप्रकारे दाखवत भारताने चीनला माघारीची विनंती केली आहे.

Story img Loader