चीन व भारत यांच्यात वादग्रस्त सीमा प्रश्नावर चर्चेची एकोणिसावी फेरी आज घेण्यात आली. जैश ए महंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझर याच्यावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घालून र्निबध लागू करावे या भारताच्या प्रस्तावात चीनने कोलदांडा घातल्याने दोन्ही देशातील संबंध ताणले गेले असताना ही चर्चा झाली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल व त्यांचे चीनमधील समपदस्थ यांग जेइशी यांनी द्विपक्षीय पातळीवर सीमा प्रश्नी चर्चा केली. सीमा प्रश्नाच्या व्यतिरिक्त वादग्रस्त द्विपक्षीय, प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय मुद्देही चर्चेला होते. चीनने या वर्षी लागोपाठ दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या दहशतवादी नेत्यांविरोधात कारवाईसाठी भारताने केलेल्या प्रयत्नात खीळ घातली आहे. गेल्या महिन्यात मौलाना मसूद अझरवर र्निबधाच्या प्रस्तावात चीनने संयुक्त राष्ट्रांच्या र्निबध समितीत नकाराधिकाराचा वापर केला होता. अझरवर र्निबध घालण्यासाठी आवश्यक अटींची पूर्तता होत नाही, असा दावा चीनने सुरक्षा मंडळात केला होता. त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न उपस्थित केला होता.
अजित डोव्हल हे चीनचे पंतप्रधान ले केकियांग यांच्याशीही चर्चा करणार आहेत. संरक्षण मंत्री र्पीकर यांनीही केकियांग यांच्याशी अलीकडच्या भेटीत चर्चा केली होती.

Story img Loader