भारतीय वायूसेनेचे ‘सुखोई ३०’ हे लढाऊ विमान चीनच्या सीमेवर बेपत्ता झाले होते. याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगत चीनने भारत याबाबतीत तणाव वाढवत असल्याचा आरोप केला. आपल्याला या बेपत्ता विमानाबाबत कोणतीही माहिती नाही, असे चीनने याबाबत स्पष्ट केले.
हरविलेल्या विमानाबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र या विचारणेमुळे चीन भलताच भडकला असल्याचे दिसते. चीनचे परराष्ट्रमंत्री ल्यू कांग म्हणाले, भारत आणि चीनच्या सीमेबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. दक्षिण तिबेटच्या बाबतीत दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेबाबत भारत सकारात्मक असेल आणि या भागात शांतता आणि सुव्यवस्था राहिल यासाठी प्रयत्न करेल. याशिवाय आता भारताकडून विचारण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टींची उत्तरे आमच्याकडे नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हे विमान आसाममधील तेजपूर परिसरात बेपत्ता झाले असून, त्यात दोन वैमानिक होते. भारतीय हवाई दलाकडून या विमानाचा युद्धपातळीवर शोध सुरु असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हवाई दलाचे सुखोई ३० हे विमान मंगळवारी नियमित सरावासाठी झेपावले होते. आसाममधील तेजपूरच्या उत्तर भागात असताना विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमान तेजपूर परिसरात कोसळले असावे, अशी शंकाही व्यक्त होत आहे. याआधीही अनेक सुखोई विमाने विविध अपघातांचा बळी गेले आहेत.
दोन इंजिन असलेले सुखोई ३० हे विमान रशियामधील सुखोई एव्हीएशन कॉर्पोरेशन या कंपनीने बनविलेले आहे. भारताच्या सुरक्षेमध्ये या विमानाचा मोठा सहभाग आहे. हे विमान सर्व ऋतुंमध्ये सक्षमपणे उड्डाण करु शकत असल्याने ते हवाई दलासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.