चीनने प्रादेशिक भांडणे सोडवण्यासाठी बळाचा वापर करू नये असा सज्जड दम अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आशिया दौरा गुंडाळताना दिला असून दुसरीकडे फिलिपिन्सला पोलादी पाठिंबा देण्याचे आश्वासन पाळण्याचे आश्वासन देऊन चुचकारले आहे.
ओबामा यांनी मनिला येथे अमेरिका व फिलिपिन्सच्या जवानांपुढे भाषण करताना चीन व अमेरिकेच्या मित्र राष्ट्रातील सागरी संघर्षांबाबत चिंता व्यक्त केली, तणावाचे वातावरण या प्रदेशात असल्याचे त्यांनी चार देशांचा दौरा आटोपताना सांगितले.
ते म्हणाले, की लोकांना शांततेत व सुरक्षेत राहण्याचा अधिकार आहे त्यांचे सार्वभौमत्व कुणी हिरावून घेता कामा नये, प्रादेशिक एकात्मतेचा मान केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होता कामा नये. सागरी स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असे आवाहन ओबामा यांनी केले.
जी भांडणे व संघर्ष आहेत ती शांततामय मार्गाने सोडवावीत कुणाला धमकावून किंवा बळाच्या वापराने सोडवू नयेत. फिलिपिन्सचे चीनशी दक्षिण चीन सागरातील काही बेटांच्या मालकीवरून भांडण आहे. दक्षिण चिनी सागरातील बेटे आमचीच आहेत असा चीनचा दावा असून तेथे तेल व वायूचा मोठा साठा आहे, याकडेही ओबामा यांनी लक्ष वेधले. फिलिपिन्सचे लष्कर कमकुवत असून तो अमेरिकेचा मित्र देश आहे. चीनच्या वाढत्या लष्कराला तोंड देण्यासाठी व राजनैतिक दबाव टाकण्यासाठी फिलिपिन्सला अमेरिकेशिवाय पर्याय नाही. फिलिपिन्स व अमेरिका यांच्यात काल करार झाला असून त्यात फिलिपिन्सच्या तळावर अमेरिकी लष्कराचे अस्तित्व वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. कुठल्याही आक्रमणापासून बचाव करण्यास आम्ही तुमच्याशी वचनबद्ध आहोत, असे ओबामा यांनी या वेळी सांगितले. ओबामा यांनी जपानला पाठिंबा दिला असून त्या देशाचेही पूर्व चीन समुद्रातील बेटांच्या ताब्यावरून चीनशी भांडण आहे.
प्रादेशिक भांडणे सोडवण्यात चीनने बळाचा वापर करू नये – ओबामा
चीनने प्रादेशिक भांडणे सोडवण्यासाठी बळाचा वापर करू नये असा सज्जड दम अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आशिया दौरा गुंडाळताना दिला असून दुसरीकडे फिलिपिन्सला पोलादी पाठिंबा देण्याचे आश्वासन पाळण्याचे आश्वासन देऊन चुचकारले आहे.
First published on: 30-04-2014 at 12:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China should not use power while solving regional disputes