चीननं अक्साई चीन आपल्या नकाशात दाखवण्याची आगळीक केल्यानंतर त्यावर देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली असताना दुसरीकडे राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी नुकताच आपला लडाख दौरा पूर्ण केला असून त्यानंतर आज सकाळी परत येताना विमानतळावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी चीनच्या आगळिकीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींवर टीकास्र सोडलं.
काय म्हणाले राहुल गांधी?
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची औपचारिक भेट घेत असताना दुसरीकडे राहुल गांधी लडाखमध्ये दौरा करत होते. या दौऱ्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यांना माध्यमांनी चीनच्या आगळिकीविषयी विचारणा केली असता त्यांनी मोदी इतकी वर्षं खोटं बोलत असल्याचा दावा केला.
“मी तर कित्येक वर्षांपासून सांगतोय. मी आत्ता लडाखहून आलोय. पंतप्रधान इतक्या वर्षांपासून सांगतायत की लडाखमध्ये एक इंचही जमीन गेलेली नाही. पण हे साफ खोटं आहे. आख्ख्या लडाखला माहिती आहे की चीननं आपली जमीन अतिक्रमित केली आहे. नकाशाची बाब तर गंभीर आहे. पण त्यांनी आपली जमीनही घेऊन टाकली आहे. त्यामुळे यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीतरी बोलायला हवं”, असं राहुल गांधी म्हणाले.
मोठी बातमी! चीनच्या नव्या नकाशात अरुणाचल प्रदेशचा समावेश, तैवानसह ‘या’ भागांवरही दाखवला हक्क
चीनची आगळीक, अक्साई चीन आणि नकाशा
मंगळवारी चीननं जारी केलेल्या देशाच्या अधिकृत नकाशामध्ये लडाख आणि अरुणाचलमधील काही भाग, अक्साई चीन आपल्या देशात असल्याचं दाखवलं. तसेच, तैवान व वादग्रस्त दक्षिण चीनी समुद्राचा हिस्साही आपल्या देशाला जोडला. त्यावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली असून चीनची ही कृती विचित्र असल्याची भूमिका परराष्ट्र मंत्रालयाकडून मांडण्यात आली आहे.