बीजिंग/वेनचांग : चंद्राच्या अतिदूरच्या (अंधाऱ्या) बाजूतील नमुने गोळा करून ते वैज्ञानिक अभ्यासासाठी पृथ्वीवर आणणारी चीनची ५३ दिवसांची ‘चांग-ई-६’ ही चंद्र तपासणी मोहीम शुक्रवारपासून सुरू झाली. चीनच्या दक्षिणेकडील हैनान किनाऱ्यावरील ‘वेनचांग’ अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून ‘लाँग मार्च-५ वाय रॉकेट’द्वारे ही मोहीम यशस्वी प्रक्षेपित झाल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
मानवाच्या चंद्र संशोधन मोहिमेचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाने (सीएनएसए) म्हटले आहे. ‘चांग-ई-६’ मोहिमेत ऑर्बिटर, लँडर, एसेंडर आणि री-एंट्री मॉडय़ूल आदी चार घटक समाविष्ट केले आहेत. चंद्रावरील धूळ आणि खडक गोळा केल्यानंतर एसेंडर हे नमुने चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत री-एंट्री मॉडय़ूलमध्ये हस्तांतरित करण्यासाठी पाठवेल, जे त्यांना पृथ्वीवर परत घेऊन जाईल.
हेही वाचा >>> ‘बीएनएस’मध्ये बदलांचा विचार करावा! महिलांविरुद्ध क्रौर्यावरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना
चांग-ई-६च्या लँडरवर इटली, फ्रान्स, आणि स्वीडनची वैज्ञानिक उपकरणे असतील, विशेष म्हणजे ऑर्बिटरमध्ये पाकिस्तानच्या ‘पेलोड’चाही समावेश आहे. चीनने पहिल्यांदाच पाकिस्तानचे ऑर्बिटर आपल्या चंद्र मोहिमेत समाविष्ट केले आहे. ‘आयक्यूब-क्यू’ हा कृत्रिम उपग्रह शांघाय विद्यापीठ एसजेटीयू आणि ‘सुपार्को’ या पाकिस्तानी अंतराळ संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे.
मोहिमेचे पौराणिक नाव
‘चांग’ हे नाव चीनच्या पौराणिक चंद्रदेवीवरून ठेवण्यात आले आहे. ‘चांग-ई-५’ने चंद्राच्या बाजूचे नमुने गोळा करून आणले आहेत. त्याचे विश्लेषण केल्यानंतर चंद्रावर पाणी आढळले. भविष्यात चंद्रावर केंद्र उभारण्याची चीनची योजना आहे. चीनने यापूर्वी लँडिंग रोव्हरसह चंद्रावर मानवरहित मोहीम यशस्वी केल्या आहेत.