बीजिंग : चीनमध्ये पर्यटन तसेच व्यापारासाठी येणाऱ्या दक्षिण कोरियाच्या नागरिकांना व्हिसा देणे चीनने मंगळवारी थांबविले. तशी सूचना सोलमधील चिनी दूतावासाने जारी केली आहे. चीनमधून दक्षिण कोरियात येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे चीनने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
जपानच्या कीओदो वृत्त संस्थेने म्हटले आहे की, या बंदीचा फटका जपानी प्रवाशांनाही बसणार आहे. जपानच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, याबाबत चिनी अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा सुरू आहे.
सोलमधील चिनी दूतावासाच्या वूईचॅट खात्यावर जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर दक्षिण कोरियाने घातलेले मनमानी निर्बंध मागे घेतले जात नाहीत, तोवर बंदी लागू असेल.
चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय ४८ तासांत मागे घेतला नाही, तर जशास तसे उत्तर देण्याचा इशारा चीनने दिला होता.
चीनमधील करोनाचा युरोपला तूर्त धोका नाही; जागतिक आरोग्य संघटनेचा निर्वाळा
कोपेनहेगन : चीनमध्ये झालेल्या करोनाच्या उद्रेकामुळे सध्या तरी युरोपीय देशांना धोका नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपमधील कार्यालयाचे संचालक हॅन्स क्लूग यांनी म्हटले आहे. मात्र याबाबत अधिक तपशीलवार माहिती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चीनमधील करोना निर्बंध तडकाफडकी मागे घेण्यात आल्यानंतर तेथे करोनाचा मोठय़ा प्रमाणावर उद्रेक झाल्याचे मानले जाते. क्लूग यांनी म्हटले आहे की, चीनकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळालेल्या माहितीनुसार, सध्या तरी युरोपमध्ये करोनाचा धोका उद्भवणार नाही, पण याबाबत निश्चिंत राहता येणार नाही. चीनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी जगभरातील अनेक देशांनी करोना चाचणी अनिवार्य केली आहे. पण याला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा चीनने दिला होता. चीनने मंगळवारपासून दक्षिण कोरियाच्या नागरिकांना व्हिसा देणे थांबविले आहे.