एपी, बीजिंग : अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांच्या तैवान दौऱ्याच्या निषेधार्थ चीनने अमेरिकेशी जागतिक तापमानवाढ, लष्करी मुद्दे आणि अमली पदार्थ प्रतिबंधक उपायांसंदर्भात होणाऱ्या चर्चा स्थगित केल्या आहेत.

पलोसी यांच्या तैवान दौऱ्यास कडवा विरोध करताना चीनने अमेरिकेला दुष्परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर चीनने शुक्रवारी हे पाऊल उचलले आहे. तैवान हा आपला भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे. पलोसींच्या दौऱ्यानंतर चीनने तैवानच्या परिसरात लष्करी सराव सुरू केला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, की उभय देशांतील सैन्य आणि सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चेसह, विभागीय कमांडर आणि लष्करी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावरील चर्चा चीनतर्फे रद्द करण्यात आली आहे. अवैध प्रवाशांना परत पाठवणे, आंतरराष्ट्रीय गुन्हे, अवैध अमली पदार्थ व जागतिक तापमानवाढीसंदर्भातील चर्चा-सहकार्य स्थगित करण्यात आले आहे.

पलोसी यांच्यावर चीनचे प्रतिबंध

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात नॅन्सी पलोसी यांच्या तैवान भेटीला ‘चिथावणीखोर कृत्य’ म्हटले आहे. त्यांचे हे पाऊल चीनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या विरोधात असल्याचे त्यात म्हटले आहे. या निवेदनानुसार पलोसी आणि त्याच्या कुटुंबावर निर्बंध लादले जातील. मात्र, हे निर्बंध नेमके कोणत्या स्वरूपाचे असतील, हे चीनने स्पष्ट केलेले नाही. सहसा असे निर्बंध प्रतीकात्मक स्वरूपाचे असतात, असे सांगितले जाते.

Story img Loader