भारत आणि चीन या दोन्ही देशांचे संबंध आणि व्यापक हित लक्षात घेऊनच आम्ही लडाखच्या देस्पांग खोऱ्यातील दौलतबेग ओल्डी येथील आमचे सैनिक माघारी घेतले आहेत. उभय देशांनी लष्करी व मुत्सद्दी पातळीवरील चर्चेचे सर्व मार्ग स्वीकारले आणि संयमाने हा पेच सोडविला, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी सोमवारी येथे सांगितले.
गेले २० दिवस उभय देशांत या घुसखोरीवरून तणाव निर्माण झाला होता. लष्करी पातळीवरील चर्चेच्या चार फेऱ्या निष्फळ ठरल्या होत्या. उभय देशांत नेमका कोणता तोडगा निघाला, याचा तपशील द्यायचे टाळत हुआ म्हणाल्या की, उभय बाजूने सकारात्मक चर्चा झाली आणि त्यातूनच हा निर्णय झाला. सीमेवर शांतता असणे हे दोन्ही देशांच्या सारख्याच हिताचे आहे. सीमाप्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघावा आणि दोन्ही देशांच्या सीमांची निश्चिती व्हावी, यासाठी आम्ही भारताबरोबर सर्व ते सहकार्य करण्यास उत्सुक आहोत, असेही त्यांनी नमूद केले. या संबंधांतील अन्य सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याचे त्यांनी टाळले. तुम्ही सर्वच याबाबत उत्सुक आहात याची मला जाणीव आहे, पण मला जे वास्तविक आहे आणि अधिकृत आहे तेच सांगितले पाहिजे. त्यामुळे जसजशी माहिती मिळेल मी ती जाहीर करीन, असे उत्तर त्यांनी दिले.
लडाखमधील दौलतबेग ओल्डी क्षेत्रातून रविवारी रात्री उशिरा चीन आणि भारत या दोहोंच्या लष्कराने आपापले सैन्य माघारी घेतले. अर्थात चीनने माघारीसाठी, भारतानेही आपले सैन्य मागे घ्यावे, ही पूर्वअट घातल्याने मुत्सद्दी पातळीवर चीननेच भारतावर कडी केली आहे. १५ एप्रिलला चीनने भारताची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून १९ किलोमीटर आतवर घुसखोरी करीत लडाखमधील दौलतबेग ओल्डी क्षेत्रात पाच तंबू ठोकले होते. भारताने त्याला तीव्र आक्षेप घेतला तरी दिवसागणिक चीनची आक्रमकता वाढतच होती. त्यांचे ५० सैनिक, लष्करी वाहनेही तेथे दाखल झाली. त्यानंतर तेथून ३०० मीटर अंतरावर भारताने आपले सैनिक आणून छावणी टाकली. उभय देशांत हा पेच सोडविण्यासाठी ब्रिगेडियर पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या. रविवारच्या चौथ्या फेरीत चीनने १५ एप्रिलपूर्वीची स्थिती ‘जैसे थे’ करावी, असा प्रस्ताव भारताने ठेवला. चीनने तो धुडकावला व आम्ही आमचे सैन्य मागे घ्यावे असे भारताला वाटत असेल तर त्यांनी प्रथम त्यांचे सैन्य मागे घ्यावे, असे बजावले. अखेर मुत्सद्दी पातळीवर भारतानेही माघारीचा निर्णय घेतल्यानंतर हा पेच सुटला. चीनचे पंतप्रधान लि केकियांग हे २० मेपासून भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद ९ मे रोजी चीनला जात आहेत. सध्या इराणमध्ये असलेले खुर्शीद यांनी माघारीच्या तोडग्याबाबत फारसे समाधान व्यक्त केलेले नाही. चीनकडून माघारीसाठी अधिक चांगली वागणूक अपेक्षित होती, असे त्यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

Story img Loader