करोनाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन वर्षांत चीन जगभरातल्या देशांच्या निशाण्यावर राहिला आहे. त्यासंदर्भात चीनला निर्बंध देखील सोसावे लागले आहेत. त्यानंतर तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांनी चीनविरोधात शड्डू ठोकले आहेत. युद्ध झालं तर हे देश तैवानच्या बाजूने चीनविरोधात उभे राहतील असंच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता चीनमधील बिजिंग आणि शिनजियांग प्रांतात मानवाधिकारांचं प्रचंड उल्लंघन होत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जात असून त्यासाठी चीनला मोठा विरोध पत्करावा लागत आहे. पण आता याच संदर्भात चीननंच जगातील महासत्तांना आणि प्रगत देशांना उघड धमकीच दिली आहे.
मानवाधिकारांचं उल्लंघन
बिजिंग आणि शिनजियांग प्रांतामध्ये उग्यूर आणि तुर्की भाषिक मुस्लिमांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांकडून सातत्याने निषेध केला जात असून चीनला समज दिली जात आहे. मात्र, त्यानंतर देखील चीन याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचंच चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने यासंदर्भात मोठं पाऊल उचलत २०२२ साली बिजिंगमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांवर डिप्लोमॅटिक बॉयकॉट अर्थात आपले राजनैतिक अधिकारी या स्पर्धेला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं देखील अमेरिकेच्याच पावलावर पाऊल ठेवत डिप्लोमॅटिक बॉयकॉटचा मार्ग स्वीकारला आहे. त्यापाठोपाठ ब्रिटन आणि कॅनडानंही बिजिंग ऑलिम्पिकवर धोरणात्मक बहिष्कार टाकला आहे.
चीनला धडा शिकवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचंही अमेरिकेच्या पावलावर पाऊल, घेतला मोठा निर्णय!
ड्रॅगनच्या शेपटावर पाय!
पण अमेरिकेसोबत इतर तीनही देशांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चीनी ड्रॅगनच्या शेपटावर पाय पडल्याप्रमाणे चीन चवताळून उठला आहे. यासंदर्भात चीननं आता आक्रमक भूमिका जाहीर केली असून बिजिंग ऑलिम्पिकवर अशा प्रकारे धोरणात्मक बहिष्कार टाकणाऱ्या देशांना थेट इशारा दिला आहे.
चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी यासंदर्भात चीनची भूमिका स्पष्ट करताना इतर देशांना इशारा दिला आहे. “अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडा यांनी ऑलिम्पिक स्पर्धांचा वापर राजकीय हेतूसाठी केला आहे. हे अजिबात स्वीकारार्ह नसून स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. ते करत असलेल्या या चुकीच्या गोष्टींसाठी त्यांना किंमत चुकवावीच लागेल”, असं वँग वेनबिन यांनी म्हटलं आहे.
“चीन हल्ल्यासाठी पूर्णपणे सज्ज, २०२५मध्ये…”, तैवाननं दिला गंभीर इशारा!
तैवानच्या मुद्द्यावरून वाद
चीनकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तैवानवर हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तैवान हा चीनचाच भाग असल्याचं चीनकडून वारंवार ठसवलं जात आहे. तैवानला मात्र आपलं सार्वभौमत्व कायम ठेवायचं आहे. यासाठी तैवाननं युद्धासाठी सज्ज असल्याचं देखील जाहीर केलं आहे. मात्र, त्याचवेळी चीननं देखील आक्रमणाची तयारी पूर्ण केली असून चीन कधीही तैवानवर हल्ला करू शकतो, अशी भिती देखील तैवानकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या देशांनी तैवानला पाठिंबा देत चीनविरोधात युद्धात उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.