भारताला कोणत्याही प्रकारची कल्पना न देता चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर आणखी तीन धरणे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या या पवित्र्यामुळे भारताने चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
चीन सरकारने ब्रह्मपुत्रा नदीवर दागु, जिआचा आणि जिएक्सू येथे तीन धरणे बांधण्याचा प्रस्ताव नुकताच मंजूर केल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांनी दिली.
चीनमध्ये ब्रह्मपुत्रा नदी यारलुंग झँगबो या नावाने ओळखली जाते. चीनच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत या धरणांचे काम करण्यात येणार आहे. याबद्दल चीन सरकारकडून कोणतीही विस्तृत माहिती भारत सरकारला देण्यात आलेली नाही, असे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
धरणबांधणीबद्दल विचारणा केली असता चिनी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते हाँग लेई यांनी पत्रकारांना सांगितले की, दोन देशांमधून जाणाऱ्या नदीवर करण्यात येणाऱ्या विकासकामांबद्दल चीन नेहमीच जबाबदारीने वागला आहे. कोणताही प्रकल्प वैज्ञानिक नियोजनाच्या मदतीने दोन्ही देशांचे हित लक्षात घेऊनच करण्याकडे चीनचा कल असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारू लागलेले असतानाच चीनने नव्याने केलेल्या या आगळिकीमुळे भारताने चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या या आक्रमक भूमिकेचा विपरीत परिणाम दोन्ही देशांच्या सुधारत असलेल्या संबंधांवरही होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Story img Loader