व्ही. के. सिंग यांचा इशारा

पाकिस्तानच्या जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा नेता मौलान मासूद अझहर याला र्निबध यादीत टाकण्यास चीनने नकाराधिकार वापरून विरोध केला असला तरी चीनलाही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा फटका बसेल व त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, असे केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी सांगितले.

चीन व पाकि स्तान यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. त्यांचे संबंध चांगले आहेत, पण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा फटका चीनला बसल्याशिवाय राहणार नाही, असे सिंग यांनी गोरखनाथ मंदिरास भेट देण्यासाठी आले असताना सांगितले.

चीनच्या राजनयात पाकिस्तानला महत्त्वाचे स्थान आहे. चीनने अझहरला संयुक्त राष्ट्रांच्या र्निबध यादीत केलेला विरोध त्यातूनच केलेला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा फटका एक दिवस चीनला बसेल व त्यांना भारतविरोधी निर्णयाची किंमत मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिला. पठाणकोट येथे दोन जानेवारीला झालेल्या हल्ल्यानंतर भारताने फेब्रुवारीत संयुक्त राष्ट्रांना पत्र पाठवून अझहरला अल कायदा र्निबध समितीच्या अंतर्गत र्निबध यादीत टाकण्याची विनंती केली होती. दहशतवाद विरोधी कार्यकारी संचालनालयाने भारताची विनंती विचारात घेताना पुरावे बघता ती तांत्रिक कारणास्तव फेटाळण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. तांत्रिक समितीने भारताचा प्रस्ताव अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांच्यापुढे मांडण्यास मान्यताही दिली होती, पण चीनने त्यात कोलदांडा घालताना अझहर याच्यावर बंदी घालू नये असा पवित्रा घेत नकाराधिकार वापरला होता. चीनचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी लिउ जेयी यांनी सांगितले की, अझहर हा दहशतवादी म्हणून र्निबध घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अटीत बसत नाही.