आंतरराष्ट्रीय राजकारणातील ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या सूत्राचा वापर कायम राखीत चीनने पाकिस्तानला दोन अणूभट्टय़ा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. भारताने याबाबत चीनकडे राजनैतिक व अधिकारी पातळीवर नाराजी व्यक्त केली असून अणूपुरवठादार गटाच्या कानावरही ही बाब घातली आहे.
चीन पाकिस्तानला ११०० मेगावॉटची अणुभट्टी ‘एसीपी १०००’ या मालिकेत विकणार असून ती आधुनिक व प्रगत अणुभट्टी आहे. ही अणुभट्टी कराचीत कनुप २ व ३ या भागात बसवण्यात येत असून त्याची किंमत ९.६ अब्ज डॉलर इतकी आहे.
या अणुभट्टीच्या संदर्भात दोन्ही देशात गतवर्षी झालेल्या चर्चेदरम्यानच भारताने आपले आक्षेप नोंदवले होते. मात्र चायना नॅशनल कॉर्पोरेशन लि. या कंपनीने पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी आण्विक भट्टी उभारण्याच्या दृष्टीने काही प्राथमिक करार केले आहेत.
अणुपुरवठादार देश व एनपीटीचा सदस्य या नात्याने चीनने अशा प्रकारे अणुभट्टीची विक्री करणे योग्य नाही असे भारताचे मत आहे. चीनने पाकिस्तानशी अणुसहकार्य अशा प्रकारे वाढवत नेले तर त्यामुळे भारताला धोका आहे, कारण पाकिस्तानचा अणुकार्यक्रम नागरी नसून लष्करी स्वरूपाचा आहे.
अणुसुरक्षा गटात काही मध्यस्थांमार्फत भारताने गेल्यावर्षी हा मुद्दा मांडला होता, त्यानंतर १३ व १४ जूनला प्राग येथे होणाऱ्या अणु सुरक्षा गटाच्या बैठकीतही चीनने पाकिस्तानला अणुभट्टी देण्याबाबत काही देशांनी आक्षेप नोंदवला होता. पंतप्रधान पुढील महिन्यात चीनला जाणार असून त्या वेळी हा मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China to give pakistan two more nuclear reactors india protests
Show comments