Rahul Gandhi on India-China Dispute: केंद्र सरकारने भारत-चीन सीमा वाद आणि अमेरिकेचे समन्यायी व्यापार कर हे दोन विषय ज्या प्रकारे हाताळले, त्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. या टीकेनंतर भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर पलटवार केला. राहुल गांधी आपल्या भाषणादरम्यान म्हणाले, परकीय शक्तीसमोर गुडघे टेकणे हे भाजपाची जुनी पद्धत आहे. सीमेवर परिस्थिती सामान्य राहावी याच्या विरोधात आम्ही नाही. मात्र हे तत्व दोन्ही बाजूंनी पाळायला हवे. आम्हाला वाटते आपली जी जमीन चीनने बळकावली आहे, ती परत मिळायला हवी.
राहुल गांधी म्हणाले, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी चीनच्या राजदूतांना पत्र लिहिल्याचे मला कळले. पण ही माहिती आपल्या लोकांकडून नाही तर चीनच्या राजदूतांकडून आम्हाला कळली.
भारत-चीन सीमेवरील संघर्षाबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “चीनने भारताचा ४,००० एकरचा प्रदेश गिळंकृत केला आहे. चीनशी संघर्ष करताना आपले २० जवान शहीद झाले आहेत आणि आपण चीनबरोबर केक कापत आहोत.”
अमेरिकेच्या व्यापारकराबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आमच्या मित्र राष्ट्राने आपल्यावर आयातशुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आपण उध्वस्त होऊ शकतो. एकीकडे आपली जमीन बळकावली जात आहे आणि दुसरीकडे आपल्यावर आयातशुल्क आकारले जात आहे, याबद्दल केंद्र सरकार काय करत आहे.
राहुल गांधींच्या टिकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, जे लोक भारत आणि चीनच्या विषयाबाबत सभागृहात बोलत आहेत. तेच चीनी लोकांबरोबर एकत्र बसून सूप पितात. तसेच भारताची एक इंचही जमीन चीनने घेतलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले, “चीनने भारताच्या प्रदेशाचा ताबा कुणाच्या काळात घेतला होता? राजीव गांधी फाउंडेशनने चीनी अधिकाऱ्यांकडून पैसे का घेतले? अक्साइ चीनला चीनने कसे काय बळकावले आणि काँग्रेस हातावर हात ठेवून त्या काळी कशी काय बसली?”