कलम ३७० रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. असं असतानाच दुसरीकडे चीनने आता भारताविरुद्ध सैनिक म्हणून चक्क रोबोटचा वापर करण्याची तायरी केली आहे. चीनने नुकताच या ‘रोबो सोल्जर’चा सराव ‘पश्चिमेला असणाऱ्या शेजारी देशाच्या सीमेजवळच्या बर्फाच्छादित पाठारावर’ घेतल्याचे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यांनी सांगितले आहे. मात्र नक्की हा सराव कोणत्या प्रदेशामध्ये पार पडला याबद्दलची माहिती स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी १४ हजार फुटांवर असणाऱ्या पठारावर अनेक दिवस हा सराव सुरु होता अशी माहिती सरकारी प्रसारमाध्यांनी दिली आहे.
२०१७ साली सिक्कीममधील डोकलाम परिसरात भारत आणि चीनचे सैन्य जवळजवळ ७२ दिवस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. ‘एखाद्या पाठरावर युद्ध करण्याचा सराव नुकताच चीनच्या सैन्यदलाने केला. या सरावादरम्यान चीनने पहिल्यांदाच आपल्याकडील सर्वात शक्तीशाली आणि प्रभावी मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर केला. चीनकडे असणाऱ्या ‘टाइप ९९ ए’ या आधुनिक रणगाड्यांबरोबरच युद्धभूमीवर वापरता येईल अशा ‘रोबो सोल्जर’चाही या सराव अभ्यासामध्ये समावेश करण्यात आला,’ अशी माहिती चायना सेंट्रल टेलिव्हिजनने (सीसीटीव्ही) या सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार हा सराव किंघाई-तिबेट पठारावर करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत-चीन सिमारेषा या पठारापासून पश्चिमेकडे आहे. चीनी लष्कराने रोबोट आणि आधुनिक रणगाडे वापरुन शत्रूची बचावफळी कशी भेदायची याचा सराव काही दिवस चाललेल्या या युद्ध अभ्यासात केला. पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या (पीएलए) ७६ ग्रुप आर्मी या तुकडीने या युद्ध सरावामध्ये सहभाग घेतला होता. “४ हजार २०० मीटरवर झालेल्या या युद्ध सरावामध्ये जवानांनी खऱ्याखुऱ्या स्फोटकांचा वापर केला,” असं सरकारी अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. उंचावरील भूप्रदेशामध्ये नवीन शस्त्रे किती कार्यक्षम आहेत याची चाचपणी करण्यासाठी हा सराव करण्यात आला.
“उंच ठिकाणी असणाऱ्या पठारावर रणगाडे घेऊन जाताना काय अडचणी येतात याची कल्पना या अभ्यासामुळे आली आहे. त्यामुळे आता अशा पठारांवर रणगाडे नेताना काय करावे यासंदर्भात आम्ही उपाय शोधून काढला आहे. शस्त्रांचा जास्तीत जास्त प्रभावीपणे वापर करण्यासाठी हा अभ्यास फायद्याचा ठरला,” असं या अहवालात म्हटले आहे.
सामान्यपणे चीन आपल्या लष्करी सरावांची माहिती जाहीर करत नाही. अशाप्रकारे उंच ठिकाणी सराव करण्याची चीनही ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी जून महिन्यामध्ये किंघाई-तिबेट पठारावर करण्यात आलेल्या लष्करी सरावाबद्दल चीनने पहिल्यांदाच माहिती दिली होती. त्याआधी २०१७ सालीही चीनने डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर असा युद्ध सराव चीनने केला होता.