जपानला मागे टाकत चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. आता जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेशी टक्कर देण्याचा प्रयत्न चीन करत आहे. व्यापार, उद्योग, अवकाश तंत्रज्ञान, खेळ, संशोधन, विज्ञान, वहातुक अशा विविध क्षेत्रात चीन अमेरिकेवर कुरघोडी करत जगावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्रही मागे नाहीये. चीन गेल्या दोन दशकांपासून वेगाने संरक्षण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
असं असतांना अमेरिकेच्या संरक्षण विभागाने चीनच्या लष्करी तयारीबाबत खास करुन अण्वस्त्र क्षमतेबाबत एक अहवाल तयार केला आहे. यानुसार चीनकडे २०३० पर्यंत एक हजार अण्वस्त्र असतील असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी चीनकडे सुमारे ३५० अण्वस्त्रे असावीत असा एक अंदाज होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून चीनचे लष्करी सामर्थ्य वाढत असून २०३० पर्यंत एक हजार अणु बॉम्ब तयार करण्याची क्षमता चीनकडे झालेली असेल असं या अहवालात म्हंटलं आहे.
चीनकडे जमिनवरुन जमिनीवर मारा करणारी, पाण्याखालून पाणबुडीतून जमिनीवर मारा करणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. तसंच दीर्घ पल्ला असलेली बॉम्बफेकी विमानेही चीनकडे तयार होत आहेत. एवढंच नाही तर लष्कर, लढाऊ विमाने, युद्धनौका, पाणबुडी यांमध्ये लक्षणीय वाढ चीन दरवर्षी करत आहे. यामुळेच जास्तीत जास्त अण्वस्त्र वाहून नेता येतील, वेळप्रसंगी हल्ला करता येईल अशी क्षमता चीनची तयार होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अण्वस्त्रासाठी आवश्यक असलेल्या प्लुटोनियमच्या निर्मितीकडे चीनकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या ‘फास्ट ब्रीडर रिएक्टर’ प्रकारातील अणुभट्टीबाबत मोठी गुंतवणूक चीन करत आहे.
आजुबाजुला असलेल्या भारतासह बहुतेक सर्व देशांच्या सीमेबाबत चीनचे जसे वाद सुरु आहेत तसंच ‘तैवान’ या छोटेखानी देशावर चीन गेली कित्येक वर्ष दावा करत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तैवान परिसरात चीनचे हवाई दल आणि नौदल यांच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अमेरिका सुरुवातीपासून तैवान देशाच्या मागे खंबीरपणे उभी राहीली आहे. यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून तैवान देशामुळे अमेरिका आणि चीन यामधील संबंध हे ताणले गेले आहेत. या पार्श्वभुमिवर चीनच्या वाढत्या लष्करी ताकदीबाबत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अहवाल तयार केला आहे ज्यात चीनची अण्वस्त्र क्षमता वाढत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.