पाकव्याप्त काश्मिरातील गिलगिट आणि बाल्टिस्तानवर ताबा मिळवण्याच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाष्यानंतर चिनार कोर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल एडीएस औजला यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “कोणतेही आदेश मिळाल्यास कारवाई करण्यास लष्कर पूर्णपणे तयार आहे. आम्ही आमच्या क्षमतांमध्ये आणखी वाढ करत आहोत. आदेश मिळाल्यास मागे वळून पाहणार नाही”, असे औजला यांनी म्हटले आहे.
औजला १५ कोर्प्सचे कमांडर आहेत. श्रीनगरमधील कोर्प्स मुख्यालयातील पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदी करारानंतर गेल्या २० महिन्यांत भारतीय लष्कराच्या एकूणच संरक्षण सज्जतेला प्रचंड चालना मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले होते राजनाथ सिंह?
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागांपर्यंत पोहोचल्यानंतरच काश्मीरच्या संपूर्ण विकासाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवर पाकिस्तानकडून अत्याचार होत असून, त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. पाकिस्तानच्या बेकायदा नियंत्रणाखाली असलेला भाग परत मिळवण्याबाबत १९९४ साली संसदेने केलेल्या ठरावाच्या संदर्भात त्यांनी हे विधान केले आहे. अतिरेक्यांवर कारवाई केली की काही तथाकथित बुद्धिवादी मानवाधिकार उल्लंघनाबाबत ओरड करतात, असा आरोपही त्यांनी केला आहे. अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे काश्मिरी जनतेवरील अन्याय दूर झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.