महासत्ता अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चिनी अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे. नुकत्याच संपलेल्या वर्षांत चिनी अर्थव्यवस्थेने ७.७ टक्के विकासदर गाठला असून गेल्या १४ वर्षांतील हा नीचांक आहे.
गेल्याच वर्षी मार्चमध्ये झी जिनपिंग यांनी चीनच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांच्या धडाक्यामुळे चीनची अर्थव्यवस्था साडेसात टक्क्यांहूनही कमी विकासदर गाठेल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, नुकत्याच संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने ७.७ टक्के विकासदर गाठल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिनपिंग सरकारने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
विकासदर साडेसात टक्क्यांच्या आत असता तर सरकारवर आर्थिक आणि राजकीय दबाव निर्माण झाला असता. चीनने १९९९ पासून सातत्याने दहा टक्क्यांच्या आसपास विकासदर गाठला आहे. या पाश्र्वभूमीवर यंदाचा विकासदर मंदावलेला आहे.
१४ वर्षांत प्रथमच असे होत आहे. चीनच्या राष्ट्रीय सकल उत्पादनातही (जीडीपी) गेल्या वर्षांच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. यंदा ५६.८८ ट्रिलियन युआन एवढे राष्ट्रीय सकल उत्पादन झाले आहे.

हू जिंताओ यांच्याकडून सत्तासूत्रे स्वीकारणाऱ्या नव्या सरकारसाठी ही आकडेवारी निश्चितच उभारी देणारी आहे. गेल्या वर्षांत नव्या सरकारने दहा लाख रोजगार निर्माण केले तर महागाईचा दरही अडीच टक्क्यांच्या आत नियंत्रित ठेवला. त्यामुळे जिनपिंग सरकार निश्चितच अभिनंदनास पात्र आहे.
झिन्हुआ, चीनचे सरकारी वृत्तपत्र

Story img Loader