नागपूर : भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या एका जहाजामधून एका चिनी नागरिकाला सुरक्षितपणे बाहेर काढले. १६ ऑगस्टला आव्हानात्मक हवामान आणि काळोख्या रात्रीच्या दरम्यान ही एक धाडसी कारवाई करण्यात आली. जहाज चीन ते यूएई प्रवास करीत होते. त्यावरील एका व्यक्तीच्या छातीत दुखू लागले आणि त्याला हृदय विकाराची लक्षणे दिसू लागली. याबाबत मेरीटाईम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, मुंबईला माहिती मिळाली.
त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने लगेच तिकडे धाव घेतली. रुग्णाला एअरलिफ्ट करण्यात आले आणि प्रथमोपचार देण्यात आले. रुग्णाला पुढील वैद्यकीय व्यवस्थापनासाठी एजंटकडे सोपवण्यात आले. तटरक्षक दलाने अंधाराच्या वेळी हाती घेतलेल्या या ऑपरेशनमुळे समुद्रात एका परदेशी नागरिकाचा मौल्यवान जीव वाचला.