नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर एकच आठवडय़ात झालेल्या भारत-चीन यांच्यातील बैठकीत रविवारी सौहार्दपूर्ण आणि ठोस चर्चा झाली. सीमावादासारख्या वादग्रस्त मुद्दय़ावर उभय देशांत चर्चा झालीच, पण दोन्ही देशांमध्ये भविष्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यात झालेल्या बैठकीत सुमारे तीन तास चर्चा झाली. भारतीय प्रवक्त्यांकडून चर्चेच्या अजेंडय़ावर नमूद नसले तरी सीमावाद, घुसखोरी, भारतीयांसाठी विशिष्ट वर्गातील व्हिसा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरण बांधण्याच्या तसेच चीनची वाढती गुंतवणुकीविषयी दोन्ही मंत्र्यांमध्ये आशादायक बोलणी झाली.
वांग यांनी केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारची स्तुती करताना भारतासारख्या हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशाच्या विकासात आता नव्याने गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली. दोन्ही देशांतील राजकीय तसेच व्यापारी संबंधावर जगाचे लक्ष लागून राहिले आहे. यासंदर्भात दोन्ही देशांच्या गरजा आणि स्वप्नांमध्ये अधिक समानत्व असल्याचे चीनने नमूद केल्याचे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
दोन्ही देशांमध्ये सौहार्दपूर्ण, उपयुक्त आणि ठोस बोलणी झाली. याशिवाय भविष्यात उभयतांतील संबंध अधिक दृढ आणि निरंतर ठेवण्यासाठी काय योगदान देता येईल, यासंदर्भात निर्धारही व्यक्त करण्यात आला. एकमेकांच्या संवेदनशील मुद्दय़ांचा आणि प्रेरणांचा भारत आणि चीन आदरच करेल आणि दोन्ही देशांतील संबंध अधिक व्यापक, दृढ करण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.
तथापि, दोन्ही देशांमध्ये कोणत्याही मुद्दय़ांवर निर्णायक चर्चा नसली तरी उभयातांमधील मनमोकळा संवाद आणि कोणत्याही मुद्दय़ांवर चर्चेची तयारी याबाबत आपल्याला आशा बाळगायला हरकत नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
क्षमता आजमावणार
आज पहाटे वांग यांचे भारतात आगमन झाले. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी वांग यांना भेटीस बोलावतील. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या संदेशात भारतीय विकासाला आपल्या देशाचा पाठिंबा राहील. भारतातील युवांची क्षमतेला अद्याप आजमावण्यात आलेले नाही. ती क्षमता देशाच्या विकासासाठी कशी वापरता येईल याबाबत आम्ही सकारात्मक विचार करत आहोत. उद्योग आणि व्यापाराच्या वाढीसाठी याचा मोठा हातभार लागेल, अशी आशा या वेळी वांग यांनी व्यक्त केली.

Story img Loader