घरावर पडणाऱ्या ‘शासकीय कुऱ्हाडी’विरोधात दंड थोपटून रस्त्याच्या मधोमध असलेले घर राखणाऱ्या शिजियांग प्रांतातील बदकपालक शेतकरी दाम्पत्याची गाथा गेल्या पंधरा दिवसांपासून जगभरातील माध्यमांमधून वाखाणली जात होती. सरकार आणि जमीन मालक यांच्या संघर्षांत मालकाच्या हक्कांचे प्रतीक बनलेल्या या घरावर अखेर वरवंटा पडला. लुओ बाओजेन आणि त्याची पत्नी यांनी २,६०,००० येन (३९,५०० डॉलर) ही नुकसानभरपाई स्वीकारल्याचे वृत्त एपीने दिले आहे. तर गेल्या दोन आठवडय़ांपासून जगभर या घराबाबतचे कुतूहल शमविण्याची स्पर्धा लागल्यामुळे दोन डझन प्रसार माध्यम प्रतिनिधींशी रोजच्या होणाऱ्या कंटाळवाण्या भडिमाराला वैतागून या दाम्पत्याने मिळेल ती नुकसानभरपाई स्वीकारण्याचे ठरविले, अशी चर्चा आहे. शिजियांग प्रांतातील वेनलिंग शहरानजीक वृद्ध शेतकऱ्यांच्या गावाला वळसा घालून नजीकच्या रेल्वेस्थानकाला जोडणारा हमरस्ता बांधण्यात आला. या रस्त्याच्या मधोमध या दाम्पत्याचे घर येत होते. सरकारी प्रतिनिधींनी हे घर पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र, दाम्पत्याने त्यास दाद लागू दिली नव्हती. अखेरीस सरकारी यंत्रणेने नमते घेत हे घर तसेच ठेवून त्याच्या बाजूने ‘महामार्ग’ काढला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा