जपानमध्ये गोल्फ खेळणाऱ्या व्यक्तीने टोकियोतून चेंडू मारावा आणि तो पॅरिसमधील लक्ष्यामध्ये स्थिरावावा, हे जितके अवघड आहे, तितकीच मंगळ मोहीम हा अवघड प्रकार आहे. म्हणूनच भारताने मिळवलेले यश ही निश्चितच एक अतुलनीय कामगिरी आहे, अशी स्तुतिसुमने चीनमधील प्रसार माध्यमांनी उधळली आहेत. अभ्यासकांनी मात्र या मोहिमेमागे केवळ राजकीय समीकरणे असल्याचा दावा केला आहे. दक्षिण आशियाई देशांच्या अभ्यासातील तज्ज्ञ ये हॅलीन यांनी भारत सर्व जगाच्या कौतुकाला पात्र असल्याचे विधान केले आहे. तर शासन पुरस्कृत ‘चायना डेली’ या वृत्तपत्रानेदेखील भारताची तोंड भरून स्तुती केली आहे. चीनप्रमाणेच भारतीय लोकांची अवकाशातील प्रगतीबाबत स्वप्ने आहेत, मंगळयानाने जर ही मोहीम फत्ते केली तर, मानवाकडे उपलब्ध असलेल्या मंगळाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील आणि यामुळे आपले सर्वाचेच आयुष्य उजळेल, अशा शब्दांत ‘चायना डेली’ने भारताचे कौतुक केले आहे.
पेकिंग विद्यापीठातील ‘अर्थ अँड स्पेस स्टडीज’ विभागाचे प्राध्यापक जियो विझीन यांनी या मोहिमेकडे पाहताना ‘यामागे केवळ राजकीय समीकरणे’च असून आशिया खंडातील आपला प्रभाव कायम राखण्यासाठी भारताने घाईघाईने ही मोहीम तडीस नेली असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader