अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात १६ जणांना गोळ्या लागल्या असून त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी नाकेबंदी केली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये चिनी नववर्षाचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात काही अज्ञातांनी गोळीबार केला.
अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाचे आयोजन करण्यात आलं होतं. येथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमस्थळी अचानक गोळीबार सुरू झाला. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या गोळीबारात १६ जणांना गोळी लागली. ज्यामध्ये १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनास्थळी मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती. त्यामुळे गोळीबार झाल्याचं आसपासच्या लोकांना कळालं नाही. पण जेव्हा लोकांनी धावपळ करायला सुरुवात केली, त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. हा हल्ला नेमका कुणी आणि कोणत्या कारणातून केला, याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
५ दिवसांपूर्वीही घडली गोळीबाराची घटना
खरं तर, अमेरिकेत गोळीबाराची घटना घडणं नवीन नाही. पाच दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियातील गोशेन येथे गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत सहा महिन्यांच्या मुलासह १० जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या घटनेला ‘टार्गेट किलिंग’ असल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नव्हती.