नॅशनल पीपल्स पार्टी च्या १४ व्या बैठकीत शी जिनपिंग हे तिसऱ्यांदाचे चीनचे राष्ट्राध्यक्ष होतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शी जिनपिंग यांची ताकद वाढली आहे. शुक्रवारी म्हणजेच आजपासूनच ते तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. माओ त्से तुंग यांच्यानंतर पहिल्यांदाच प्रदीर्घकाळ चीनचं राष्ट्राध्यक्ष पद भुषवण्याचा बहुमान शी जिनपिंग यांच्या नावावर कोरला गेला आहे. चीन सरकार आणि अर्थव्यवस्था दोहोंवर पकड मजबूत करण्याचा निश्चय शी जिनपिंग यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनच्या खासदारांची नॅशनल पीपल्स काँग्रेसने ५ मार्चला या बैठकीची सुरूवात केली होती. ही बैठक आठवडाभर सुरू होती. या बैठकीत ६९ वर्षीय शी जिनपिंग यांना काही आव्हानांनाही सामोरं जावं लागलं आहे. त्यांच्या झीरो कोव्हिड नितीवरही काही प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र यानंतर या सगळ्या बैठकीच्या नंतर शी जिनपिंग यांचं नाव निश्चित करण्यात आलं.

चीनच्या राष्ट्राध्यक्षांची निवड चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांच्या बैठकीत केली जाते. ऑक्टोबरच्या मध्यात कम्युनिस्ट पक्षाच्या सेंट्रल कमिटीकडून देशभरात लोकप्रतिनिधींची नियुक्ती केली जाते. यंदा सुमारे ३ हजार प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. या प्रतिनिधींची बैठक पार पडते. सेंट्रल कमिटीमध्ये २०० सदस्य असतात. ही सेंट्रल कमिटी पॉलिटब्युरो मधील २५ सदस्यांची नेमणूक करतात आणि सात सदस्यीय स्थायी समितीमधून एका व्यक्तीची राष्ट्राध्यक्ष म्हणूनही निवड करतात.

चीनमध्ये एकपक्षीय राजवट आहे. चायनीज कम्युनिस्ट पार्टी म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, हा चीनचा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे. शी जिनपिंग यांची दोन वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. आता शी जिनपिंग पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत.

माओंची कारकीर्द कशी होती?

माओ त्से तुंग हे चीनमधले क्रांतिकारी, राजकीय विश्लेषक, अभ्यासक आणि कम्युनिस्ट नेते होते. चीनमध्ये त्यांनी क्रांती घडवून आणली. १९४९ मध्ये त्यांनी रिपब्लिक चीनची स्थापन केली. १९४९ ते १९७६ म्हणजेच चीन गणतंत्र स्थापन झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत माओ त्से तुंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष होते. मार्क्स आणि लेनिनच्या विचारांना सैनिक रणनितीशी जोडणारे नेते म्हणून माओंकडे पाहिलं जातं. तसंच त्यांच्या सिद्धांतांना माओवाद असंही म्हटलं जातं. त्यांच्यानंतर आता प्रदीर्घ काळ शी जिनपिंग हे १५ वर्षे राष्ट्राध्यक्षपदी असणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese parliament endorses president xi jinping leadership for rare 3rd five year term scj
Show comments