चीनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड करणाऱ्या ली केक्वियांग यांचे रविवारी येथे आगमन झाले. दुपारी तीनच्या सुमारास येथे दाखल झालेल्या केक्वियांग यांचे परराष्ट्र राज्यमंत्री इ. अहमद व परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांनी विमानतळावर स्वागत केले.
तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या केक्वियांग यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन अनेक द्विपक्षीय प्रश्नांवर चर्चा केल्याचे समजते. भारत आणि चीनमधील सीमावाद, ब्रह्मपुत्रा नदीवर चीनकडून उभारण्यात येत असलेली धरणे तसेच अन्य वादग्रस्त मुद्दय़ांवर यावेळी चर्चा झाली. पंतप्रधानांनी केक्वियांग यांच्यासाठी आपल्या निवासस्थानी रात्री विशेष मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवानीसाठी भाजप तसेच समाजवादी पार्टी या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
केक्वियांग सोमवारी राजघाट येथे महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेणार असून त्या नंतर ते राष्ट्रपती भवनाला भेट देणार आहेत. या नंतर हैदराबाद हाऊस येथे चर्चेची दुसरी फेरी होणार असून त्यात राजकीय तसेच व्यापारवृद्धीवर चर्चा होणार आहे. सोमवारी संध्याकाळी केक्वियांग आणि मनमोहन सिंग हे दोघे संयुक्त पत्रकार परिषदही घेणार आहेत.    

२७ वर्षांनंतर..
आपण २७ वर्षांपूर्वी भारतात आलो होतो, त्यावेळी जगप्रसिद्ध ताजमहाल तसेच येथील विद्यापीठे, संशोधन संस्था यांना भेट दिली होती. त्या दौऱ्यात भारतात ज्याप्रकारे आदरातिथ्य झाले, ते मी कदापि विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया केक्वियांग यांनी दिली. भारत हा महत्त्वाचा तसेच शेजारी देश असल्याने आपण हा पहिलावहिला परदेश दौरा करीत नसून २७ वर्षांपूर्वीच्या त्या दौऱ्यात मैत्रिची बीजे रोवली गेल्यानेच मी भारताची निवड केली, असेही त्यांनी नमूद केले.