पीटीआय, बीजिंग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली. ब्लिंकन यांच्या चीन दौऱ्याचा हा दुसरा दिवस होता. यावेळी झालेल्या विस्तृत चर्चेमध्ये दोन्ही देशांची काही विशिष्ट मुद्दय़ांदरम्यान एकमत झाल्याचे या भेटीनंतर सांगण्यात आले. मात्र, याबाबतचे अधिक तपशील दिले गेले नाहीत.

गेल्या पाच वर्षांमध्ये चीनला भेट देणारे ते अमेरिकेचे पहिलेच परराष्ट्रमंत्री आहेत. अमेरिकेने चीनचे हेरगिरी बलून पाडल्यापासून दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला होता.अमेरिकेने चीनवर लादलेले एकतर्फी निर्बंध उठवावेत, चीनच्या तंत्रज्ञानात्म विकासात अडथळे आणणे थांबवावे आणि चीनच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करू नये असे, आवाहन चीनच्या राजनैतिक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.चीनचे परराष्ट्र खात्याचे संचालक वांग यी आणि परराष्ट्रमंत्री चीन गांग यांनी ब्लिंकन यांच्याबरोबर मोकळेपणाने आणि सखोल चर्चा झाल्याचे क्षी जिनिपग यांनी सांगितले.

ब्लिंकन यांच्याशी झालेल्या चर्चादरम्यान त्यांच्यासमोर चीनची बाजू स्पष्ट करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि आपल्यादरम्यान बाली येथे झालेली सामायिक सहमती कायम ठेवली जाईल, तसेच दोन्ही देशांनी प्रगती केली आहे आणि काही विशिष्ट मुद्दय़ांवर एकमत झाले असेही जिनपिंग यांनी सरकारी वृत्तसंस्थेला सांगितले.

जिनपिंग यांची भेट घेण्यापूर्वी ब्लिंकन यांनी परराष्ट्र खात्याचे संचालक वांग यी यांचीही भेट घेतली. दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे वांग यांनी ब्लिंकन यांना सांगितले. तसेच अमेरिकेने चीनला वर्चस्ववादी समजू नये आणि पारंपरिक पाश्चिमात्त्य समजुतींच्या आधारे चीनविषयी गैरसमज करून घेऊ नयेत अशी विनंतीही वांग यांनी केली.

भेट का लांबली?

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जो बायडेन आणि जिनिपग यांच्या भेटीमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार ब्लिंकन हे फेब्रुवारीमध्ये चीनला भेट देणार होते. मात्र, त्यानंतर हेरगिरी बलूनच्या मुद्दय़ावरून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आणि ब्लिंकन यांचा फेब्रुवारीचा नियोजित दौरा रद्द झाला.

दोन राष्ट्रांमधील संवाद नेहमीच परस्पर आदर आणि प्रामाणिकपणावर आधारलेले असावेत. मला आशा आहे की या भेटीतून परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन हे चीन-अमेरिका संबंध स्थिर होण्यावर सकारात्मक योगदान देऊ शकतात. –क्षी जिनपिंग, अध्यक्ष, चीन

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese president xi jinping met us secretary of state anthony blinken amy
Show comments