New Bat Coronavirus : चीनच्या संशोधकांनी वटवाघुळांमधील नवीन कोरोना व्हायरस शोधून काढला आहे, ज्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी चीनच्या वुहान येथून करोना व्हायरस संपूर्ण जगात पसरला होता, ज्यामध्ये लाखो लोकांनी आपला जीव गमावला होता. त्यानंतर आता मानसांमध्ये पसरू शकतो असा नवीन करोना व्हायरसचा प्रकार आढळला आहे.

व्हायरोलॉजिस्ट शी झेंगली (Shi Zhengli) यांच्या नेतृत्वाखालील चिनी संशोधकांच्या टीमने वटवाघुळांमधील हा नवीन करोना व्हायरस शोधला आहे. या नवीन व्हायरसचे नाव ‘HKU5-CoV-2’ असे असून हा व्हायरस मर्बेकोव्हायरस (Merbecovirus) सबजीनसशी संबंधित आहे. तसेच हा नव्याने आढळलेला स्ट्रेन कोविड-१९ प्रमाणेच, तशाच पद्धतीने मानवी पेशींमधील ACE2 रिसेप्टरबरोबर जोडला जाऊ शकतो, असेही रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका अभ्यासाच्या हवाल्याने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

सेल (Cell) या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, HKU5-CoV-2 हा व्हायरस प्रयोगशाळेत मानवी पेशींना संक्रमीत करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा भविष्यात इतर प्राण्यांमध्ये पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, हा व्हायरस वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांमधील ACE2 रिसेप्टर्सबरोबर देखील एकत्र येऊ शकतो, म्हणजेच अनेक ‘इंटरमिडीएट होस्ट’च्या माध्यमातून याचे मानवांमध्ये संक्रमण होऊ शकते.

पुन्हा महामारी येणार?

मात्र संशोधकांनी यावर भर दिला आहे की, मानवी पेशींना संक्रमित करण्याची या व्हायरसची सध्याची क्षमता ही कोविड-१९ विषाणूपेक्षा खूपच कमी आहे. मानवी पेशींना जरी हा व्हायरस संक्रमित करू शकत असला तरी मानवी लोकसंख्येला याचा लगेचच धोका असल्याचे वाढवून दाखवण्याबाबत त्यांनी इशारा दिला आहे. अजून याचे निरीक्षण करणे आवश्यक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. पण यामुळे जागतिक माहामारी येणार का? याबद्दलची साशंकता अद्याप तरी कायम आहे.

कोविड-१९ बद्दलचा दावा फेटाळला

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टशी बोलताना शी यांच्या टीमने प्राण्यांमधून माणसात, तसेच मानवांमधून प्राण्यांमध्ये पसरणाऱ्या आजारांचा म्हणजेट झुनॉटिक प्रसाराचा (zoonotic transmission) धोका लक्षात घेता वटवाघुळांमध्ये तयार होणार्‍या विषाणूंवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान या नवीन व्हायरसचा शोध अशा वेळी लागला आहे जेव्हा, कोविड-१९ च्या उगम स्थानाबद्दल वादविवाद सुरू आहेत. शी या प्रसिद्ध व्हायरोलॉजीस्ट आहेत आणि त्यांना बॅट करोनाव्हायरस बद्दल त्यांच्या व्यापक संशोधनासाठी ओळखले जाते. यामुळे त्यांना ‘बॅटवुमन’ असेही म्हटले जाते. त्यांनी वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचा बचाव केला आहे. तसेच त्यांनी कोरोना व्हायरस प्रयोगशाळेतून बाहेर पडल्याचा दावा देखील त्यांनी फेटाळला आहे.

Story img Loader