चीनमधील सोशल मीडिया स्टारला राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी पाच दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशाप्रकारे शिक्षा सुनावण्यात आलेलं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं हाय प्रोफाइल प्रकरण आहे. राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी 20 वर्षीय यांग कैलीला अटक करण्यात आली आहे. यांगचे सोशल मीडियावर 4.5 कोटींहून जास्त फॉलोअर्स आहेत. यांगने 7 ऑक्टोबरला लाइव्ह स्ट्रिमिंग करत चीनचं राष्ट्रगीत ‘मार्च ऑफ द वॉलिंटिअर्स’ गायलं होतं. यावेळी ती आपला हात एखाद्या कंडक्टरप्रमाणे हलवत होती.

शांघाई पोलिसांनी माहिती देताना सांगितलं आहे की, ‘सर्व नागरिक आणि संघटनांनी राष्ट्रगीताचा सन्मान केला पाहिजे’. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशवासियांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही ठिकाणी आपली देशभक्ती दाखवण्यास सांगितलं आहे. याशिवाय सरकारने परदेशी कंटेंट ज्यामध्ये बातम्या, पुस्तकं आणि चित्रपटांवर सरकारने सेन्सॉरशिप लावली आहे.

2017 मध्ये सरकारने राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांसाठी नवा कायदा आणला होता. या कायद्यांतर्गत राष्ट्रगीताचा अपमान गुन्हा मानण्यात आला. यामध्ये शब्दांशी किंवा चालीशी छेडछाड केल्यास १५ दिवसांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती.

चीन ही शिक्षा तीन वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचीही चर्चा सुरु आहे. एका सामन्यादरम्यान नागरिकांनी चीनचं राष्ट्रगीत वाजल्यानंतर गोंधळ घातला होता. यानंतर हा विरोधात राजकीय होईल याची भीती निर्माण झाली होती.

Story img Loader