श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील चकमकीत दहशतवाद्यांकडून चीन बनवटीची ‘अल्ट्रा सेट’ दूरसंचार उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पाकिस्तानी सैन्याने वापरलेली ही उपकरणे दहशतवाद्यांच्या हाती लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे नियंत्रण रेषेपलीकडून (एलओसी) घुसखोरी केलेले तसेच शहरे आणि गावांच्या बाहेरील भागात वास्तव्य करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे आव्हान सुरक्षा दलांसमोर असणार आहे.

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांनी वापरलेले मोबाईल सुरक्षा यंत्रणांनी जप्त केले आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तानी सरकारकडून प्रशिक्षण, शस्त्रे आणि दारूगोळा मिळत असल्याचे स्पष्ट झाल्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केला. हे मोबाईल केवळ चिनी कंपन्यांनी पाकिस्तानी सैन्यासाठी तयार केले आहेत.

हेही वाचा >>> नाशिक शिक्षक मतदारसंघात आरोप-प्रत्यारोप

गेल्या वर्षी १७-१८ जुलैच्या मध्यरात्री जम्मू विभागातील पूंछ जिल्ह्यातील सुरनकोटच्या सिंदराह भागात झालेल्या चकमकीत आणि या वर्षी २६ एप्रिलला एका गोळीबारानंतर हे मोबाईल जप्त करण्यात आले होते. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरच्या चेक मोहल्ला नोपोरा भागात ही चकमक झाली होती. सुरनकोट येथील चकमकीत चार दहशतवादी ठार झाले होते. तर सोपोरमध्ये दोघा दहशतवाद्यांना गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

‘अल्ट्रा सेट’ उपकरणे पीर पंजाल प्रदेशातील दक्षिण भागातही सापडले आहेत. हे उपकरण मोबाईलच्या क्षमतांना विशेष रेडिओ उपकरणांसह एकत्रित करतात. त्यामुळे मोबाइल ग्लोबल सिस्टम (जीएसएम) किंवा कोड-डिव्हिजन या सारख्या पारंपारिक तंत्रज्ञानावर अवलंबून राहत नाहीत.

हे उपकरण संदेश वहनासाठी रेडिओ लहरींवर कार्य करते. प्रत्येक ‘अल्ट्रा सेट’ उपकरण सीमेपलीकडे नियंत्रण कक्षाशी जोडलेला असतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहशतवाद शेवटचा श्वास घेत आहे

रियासी : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद शेवटचा श्वास घेत आहे. अलीकडील दहशतवादी कृत्ये शत्रूच्या हतबलतेची चिन्हे आहेत, असे प्रतिपादन नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी केले. रियासी जिल्ह्यातील तलवाडा येथील सहायक पोलीस प्रशिक्षण केंद्रात जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या १६ व्या ‘बेसिक रिक्रूट ट्रेनिंग कोर्स बॅच’ची पासिंग आऊट परेड रविवारी पार पडली. या वेळी सिन्हा बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा संपूर्ण नायनाट करणे हे त्यांच्या प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.