प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानच्या कुरघोडय़ा सुरू असतानाच चीननेही भारताला त्रास देण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. अरुणाचल प्रदेशाला लागून असलेली सीमारेषा ओलांडून चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करून तीन दिवस मुक्काम ठोकल्याचे निदर्शनास आले आहे. तर भारताच्या इशाऱ्यांना न जुमानता पाकिस्तानने भारतीय लष्करावर गोळीबार करून शस्त्रसंधीला आपण यत्किंश्चितही जुमानत नसल्याचा प्रत्यत पुन्हा दिला आहे. पाकिस्तान आणि चीनच्या या कुरापतींमुळे एकूणच भारतासाठी शेजार अगदी बेजार झाला आहे.
चीनच्या युद्धखोरीला तोडीस तोड उत्तर देण्याच्या इराद्याने जगातील सर्वात उंचीच्या धावपट्टीवर लढाऊ विमान उतरवत भारतीय वायुदलाने सामर्थ्यांचे प्रदर्शन करण्याला २४ तासही उलटत नाहीत तोच चीनने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे उघड झाले. यावेळी चिनी सैन्याने लेह-लडाखच्या बाजूने घुसखोरी न करता अरुणाचलच्या सीमारेषेचे उल्लंघन केले. १३ ऑगस्टला गस्त घालताना चीनची ही घुसखोरी भारतीय सैनिकांच्या लक्षात आली. चिनी सैनिक चगलागामची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून तब्बल २० किलोमीटर आत आल्याचे भारतीय सैनिकांना दिसून आले. एवढेच नाही, तर चिनी सैनिकांनी त्या ठिकाणी तीन दिवस मुक्काम ठोकला. गस्त घालणारे उभय देशांच्या सैनिकांनी समोरासमोर पवित्रा घेतल्याने तेथे तणाव निर्माण झाला होता. ‘तुम्ही घुसखोरी केली आहे, मागे हटा’ अशा आशयाचे फलक भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना दाखविल्यानंतर ते मागे हटले, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानला भारताने दिलेले इशारे पुरेसे नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी लष्कराने बुधवारी लडाख येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील शक्मा येथे असणाऱ्या लष्कराच्या चौक्यांवर पाकिस्तानी जवानांनी गोळीबार केला. भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, कुरापतखोर पाकिस्तानने भारतावरच गोळीबार करण्यासाठी उद्युक्त केल्याचे आरोप केले आहेत. भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचा कॅप्टन सर्फराज ठार झाला तसेच एक सैनिक गंभीररीत्या जखमी झाला असल्याचा आरोप पाकिस्तानने केला. मात्र भारताने हा आरोप फेटाळून लावला  आहे.

लष्कराची सबुरी
चीनने केलेल्या या आगळिकीबद्दल भारतीय लष्कराने मात्र सबुरीची भूमिका घेतली आहे. आम्ही सूचना केल्यानंतर त्यांचे सैनिक माघारी गेले, गस्त घालताना अशी चूक होऊ शकते, काही वेळा आपले सैनिकही या प्रकारे पलीकडे जातात, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

Story img Loader