चीनमधील सरकारी साप्ताहिक ‘साऊथर्न वीकली’मधील पत्रकारांनी आपला संप अखेर बुधवारी मागे घेतला. माध्यमांवरील सेन्सॉरशिपबाबत पत्रकारांच्या असलेल्या आक्षेपांचा सहानभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाने आश्वासन दिल्यावर हा संप मागे घेण्यात आला. लोकशाही व्यवस्थेतील लढय़ाचे साधन असलेल्या संपाला चीनमधील पोलादी साम्यवादी व्यवस्थेत कोणतेही स्थान नाही, त्या पाश्र्वभूमीवर हा संप ही दुर्मीळ घटना मानली जात आहे.
गुवांग्झूमधून प्रकाशित होणाऱ्या ‘साऊथर्न वीकली’ या साप्ताहिकातील पत्रकार संपादकीय धोरणांमध्ये होणाऱ्या वाढत्या हस्तक्षेपाच्या विरोधात संपावर गेले होते. संपावरील कर्मचाऱ्यांनी या वेळी सरकारी सेन्सॉरशिपच्या विरोधात निदर्शनेही केली. त्यानंतर सत्तारूढ पक्षाचे प्रादेशिक प्रमुख हू चुन्हा यांनी मध्यस्थी करीत हा संप मिटविला.
या वेळी झालेल्या तोडग्यानुसार सर्व पत्रकार आपापल्या कामावर रुजू होतील व संपावर असलेल्या पत्रकारांवर सरकार कोणतीही कारवाई करणार नाही. संपकऱ्यांबद्दल चीन सरकारने मवाळ भूमिका घेतल्याचे हे एक अपवादात्मक उदाहरण आहे.
चीनमध्ये नोव्हेंबरमध्ये सत्तेची सूत्रे हू जिंताओ यांच्याकडून झी जिनपिंग यांच्याकडे हस्तांरित झाली आहेत. जिनपिंग यांनी सत्तेवर येताच माध्यमांवरील पोलादी पकड सैल केली असल्याचे मानले जात असून हा संप याचे प्रमुख उदाहरण असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.

Story img Loader