मंगळवारचा दिवस बिहारमधील राजकीय विश्लेषकांसाठी आणि एकूणच बिहारसाठीही राजकीय घडामोडींचा ठरला. आणि या घडामोडी घडत होत्या दिवंगत रामविलास पासवान यांनी स्थापन केलेल्या लोकजनशक्ती पक्षामध्ये. आणि या घडामोडींच्या केंद्रस्थानी होते रामविलास पासवान यांचे पुत्र आणि लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान! आधी पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी बंडखोरी करत खुद्द चिराग पासवान यांनाच अध्यक्षपदावरून काढल्याचं जाहीर केलं. नव्या अध्यक्षांची निवडही केली. यावरून संतप्त झालेल्या चिराग पासवान यांनी नंतर या पाचही खासदारांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं. आता लोजपाचे केवळ एकच खासदार आहेत. आणि ते खुद्द चिराग पासवान हेच आहेत!

६ पैकी ५ खासदारांची बंडखोरी!

मंगळवारी सकाळी लोजपाच्या पाच खासदारांनी पशुपती कुमार पारस यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करत थेट पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांना अध्यक्षपदावरून हटवल्याचं जाहीर केलं. त्यापाठोपाठ पशुपती कुमार पारस यांची पक्षाच्या लोकसभेतील नेतेपदी निवड देखील केली. पण यामुळे संतप्त झालेल्या चिराग पासवान यांनी थेट या पाचही खासदारांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं. यानुसार, स्वत: पशुपतीकुमार पारस, चौधरी मेहबूब अली कासर, चंदन कुमार, वीणा देवी आणि प्रिन्स राज या पाच जणांना पक्षानं बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

 

पक्ष आईसमान आहे…

चिराग पासवान यांनी या प्रकारावर आधी तीव्र संताप व्यक्त केला. यासंदर्भात त्यांनी आपले काका पशुपतीकुमार पारस यांना लिहिलेलं एक जुनं पत्र देखील ट्वीट करत या प्रकाराला ‘विश्वासघात’ असं म्हटलं. “वडिलांनी बनवलेला हा पक्ष आणि आपलं कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र अयशस्वी ठरलो. पक्ष आई समान आहे आणि आईला धोका नाही दिला पाहिजे. लोकाशाहीत जनताच सर्वकाही आहे, पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मी धन्यवाद देतो. एक जुनं पत्र सार्वजनिक करतो आहे”, असं या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

 

सर्व अधिकार चिराग पासवान यांच्याकडेच!

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर चिराग पासवान यांच्या बाजूच्या गटानं दुसरं पत्रक काढून या पाचही खासदारांची हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं. “पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने एकमुखाने संबंधित पाच बंडखोर खासदारांना पक्षसदस्यत्वातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांना आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आहेत”, असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकामध्ये पक्षाध्यक्ष म्हणून चिराग पासवान यांचंच नाव ठेवण्यात आलं आहे.

पशुपतीकुमार पारस हे लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक दिवंगत रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू. गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकांनंतर चिराग पासवान यांनी जदयू आणि मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर परखड टीका करत एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, त्यानंतर देखील त्यांनी भाजपासोबत काम करत राहण्याचा मानस देखील बोलून दाखवला होता. यानंतर कुणाला पाठिंबा आणि कुणाला विरोध या मुद्द्यांवरून पक्षामध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याचं चित्र दिसू लागलं होतं.