भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून देण्यात आलेल्या यादीनुसार महाराष्ट्रातून चित्रा वाघ यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालं आहे. राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये आल्यानंतर चित्रा वाघ यांनी सातत्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर विविध मुद्द्यांना धरून टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांचा भाजपाने राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यापाठोपाठ विजया रहाटकर यांचा गेल्या वेळी समावेश करण्यात आला होता, मात्र, आता त्यांचं नाव यादीतून काढण्यात आलं आहे. त्यासोबत विशेष निमंत्रित म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांचा देखील राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष शेलार, मुनगंटीवार विशेष निमंत्रित

भाजपानं आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ८० सदस्यांची नावं असणारी यादी जाहीर केली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील आधीच्या नावांसोबतच चित्रा वाघ यांचं नाव नव्याने समाविष्ट करण्यात आलं आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच, विशेष निमंत्रित म्हणून भाजपा आमदार आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार आणि लड्डाराम नागवानी यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या वेळी कार्यकारिणीत समावेश करण्यात आलेल्या विजया रहाटकर यांचं नाव मात्र यंदा समाविष्ट करण्यात आलेलं नाही.

राज्यातील इतर भाजपा नेते

चित्रा वाघ, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याव्यतिरिक्त प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे यांचा देखील कार्यकारिणीत सदस्य म्हणून समावेश आहे. त्यासोबत पदाधिकारी म्हणून विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री), सुनील देवधर (राष्ट्रीय मंत्री), पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री), हीना गावित (राष्ट्रीय प्रवक्त्या), जमाल सिद्दिकी (अल्पसंख्य मोर्चा), देवेंद्र फडणवीस (माजी मुख्यमंत्री) यांचा समावेश यादीमध्ये करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra wagh included in bjp national working committee pankaja munde vinod tawde pmw