पीटीआय, लंडन : ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांच्या ६ मे रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळय़ापासून त्यांची पत्नी व ब्रिटनच्या राणी (क्वीन कन्सोर्ट) कॅमिला यांनी भारताचा विख्यात कोहिनूर हिरा नसलेला राजमुकुट निवडला आहे. ही घोषणा बकिंगहॅम पॅलेसने केली आहे. भारतात इंग्रजांची वसाहत असताना हा कोहिनूर हिरा ब्रिटनमध्ये आणण्यात आला होता. तो परत मिळावा, अशी भारताची मागणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याभिषेकासाठी कॅमिला यांनी निवडलेल्या महाराणी मेरी यांच्या मुकुटात (क्वीन मेरी क्राऊन) जगातील सर्वात मोठय़ा पैलू पाडलेल्या मौल्यवान कोहिनूर हिऱ्याची प्रतिकृती लावली जाईल. कारण आता मूळ कोहिनूर हिरा राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मातु:श्री – ‘एलिझाबेथ-द क्वीन मदर’च्या मुकुटाची कायमस्वरूपी शोभा वाढवत राहणार आहे. कॅमिला यांनी राज्याभिषेकासाठी निवडलेल्या महाराणी मेरी मुकुटास ‘टॉवर ऑफ लंडन’ येथील प्रदर्शनातून हटवले आहे. आता तो या राज्याभिषेक सोहळय़ात क्वीन कन्सोर्ट कॅमिला यांना समारंभपूर्वक घातला जाईल. कॅमिला यांनी निवडलेल्या क्वीन मेरी यांच्या मुकुटामध्ये कोहिनूर हिऱ्याची विलग करण्याजोगी प्रतिकृती दर्शनी भागात लावलेली आहे. परंतु राज्याभिषेकासाठी या मुकुटात बदल होतील अथवा ही प्रतिकृती तशीच ठेवली जाईल, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही.

१०५.६ कॅरेटचा हा कोहिनूर हिरा जगातील सर्वात मोठय़ा पैलू पाडलेल्या अतिमौल्यवान हिऱ्यांपैकी एक आहे. १८५० मध्ये तत्कालीन महाराणी व्हिक्टोरियाला हा हिरा अर्पण केल्यापासून ब्रिटनच्या राजघराण्यातील दागिन्यांतील तो मुख्य दागिना बनला आहे. कोहिनूर हिरा सर्वात शेवटी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मातु:श्री ‘क्वीन मदर’ यांनी परिधान केला होता. २००२ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर हा हिरा सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

मुकुट निवडीमागे मुत्सद्दी पैलू!

कॅमिला या कोणता मुकुट निवडतील, याबाबत विविध अंदाज-शक्यता व्यक्त होत होत्या. कॅमिला राणी एलिझाबेथ द्वितीय परिधान करत असलेल्या मुकुट निवडतील, असा कयास होता. मात्र, मुत्सद्दी पैलू विचारात घेऊन मुकुटाची अंतिम निवड केल्याचे मानले जात आहे. मात्र, कॅमिला यांनी निवडलेल्या ‘क्वीन मेरी क्राउन’लाही एकेकाळी वादग्रस्त कोहिनूर हिऱ्याने सुशोभित केल्याचा इतिहास आहे. राजे चार्ल्स तृतीय हे सेंट एडवर्ड यांचा मुकुट परिधान करतील. हा ब्रिटिश राजघराण्याच्या मुकुटांतील सर्वात आकर्षक व राजघराण्यातील दागिन्यांचा केंद्रबिंदू मानला जातो. राजे चार्ल्सच्या मापासाठी या मुकुटांत सुधारणा केल्यानंतर त्यांना राज्याभिषेकापर्यंत ‘टॉवर ऑफ लंडन’ येथे प्रदर्शनासाठी पुन्हा ठेवण्यात आल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Choice of a non kohinoor crown by the queen of england ysh
Show comments