अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करारात दलाल असलेले गिडो राल्फ हाश्के यांना स्वीस अधिकाऱ्यांनी लाचखोरीच्या आरोपावरून अटक केली असल्याचे इटलीच्या प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. भारताच्या ताब्यात त्यांना दिले जाते की नाही हे यात महत्त्वाचे आहे. या हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार ३६०० कोटी रुपयांचा होता.
‘ला रिपब्लिका’ या इटालियन वृत्त संकेतस्थळाने असे म्हटले आहे, की हाशके यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर आता पुढील आठवडय़ात इटलीत आणले जाण्याची शक्यता आहे. प्रत्यावर्तन सोपस्कारांच्या विरोधात स्वीस संघराज्य न्यायालयात अपील करायचे नाही असे हाश्के यांना वाटत असेल तरच त्यांना इटलीत आणले जाण्याची शक्यता आहे.
स्वित्र्झलड येथील न्यायालयाने असे म्हटले आहे, की हाश्के याला इटलीच्या ताब्यात दिले जाऊ शकते, अशी माहिती ‘अॅन्सा’ या इटालियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरचा व्यवहार ३६०० कोटी रुपयांचा होता व त्याबाबत इटालियन व भारतीय संस्था भारतीय अधिकाऱ्यांना दलाली दिल्याच्या आरोपांबाबत चौकशी करीत होत्या.
माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांनी हा करार करण्यासाठी दलाली घेतल्याचा कथित आरोप आहे. त्यागी यांनी दलाली घेतल्याचा इन्कार केला आहे. स्वीस अमेरिकन हाश्के याचे नाव सीबीआयने म्हणजे केंद्रीय अन्वेषण खात्याने दाखल केलेल्या आरोपपत्रात असून सीबीआय या प्रकरणाची चौकशी करीत आहे.
गिडो हाश्के व कालरे गेरोसा या दोघा दलालांनी मोहाली येथील आयडीएस इन्फोटेक व चंडीगड येथील एरोमॅट्रिक्स इन्फॉर्मेशन सोल्युशन्स प्रा.लि या दोन संस्थांच्या माध्यमातून भारतात ५.६ दशलक्ष युरो इतकी दलाली पाठवली व उर्वरित रक्कम म्हणजे २४.३० दशलक्ष युरो ही ऑगस्टा वेस्टलँडकडून मिळाली, ती आयडीएस टय़ुनिशियाच्या खात्यावर जमा करण्यात आली, असे सीबीआयच्या प्राथमिक माहिती अहवालात म्हटले आहे. इटालियन फिर्यादींनी म्हटले आहे, की याबाबत प्राथमिक चौकशी झाली असून इंग्लंडमधील ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीची मातृकंपनी असलेल्या फिनमेकानिका या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना दलाली देण्यासाठी काही सेवांचा वापर केला. सीबीआयने भारतात जी चौकशी केली आहे त्यातील एफआयआरमध्ये १३ जणांची नावे घेतली आहेत, त्यात त्यागी व युरोपियन मध्यस्थ कालरे गेरोसा, ख्रिश्चन मायकेल, गिडो हाश्के यांचा समावेश आहे. त्यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे.
सीबीआयने असा आरोप केला आहे, की भारतीय हवाई दलाचे तत्कालीन प्रमुख त्यागी यांच्या संमतीने सेवा मर्यादा ६०००ऐवजी ४५०० मीटर करण्यात आली. ही हेलिकॉप्टर्स अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वापरण्यात आली होती. खरेतर सुरक्षा कारणास्तव याच मुद्दय़ावर अगोदर विरोध करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chopper deal middleman haschke arrested
Show comments