बाली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या छोटा राजनला सीबीआयकडून आजच भारतात आणले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक राजनला ताब्यात घेण्यासाठी रविवारीच बाली येथे दाखल झाले होते. सध्या या पथकाकडून छोटा राजनची चौकशी सुरू असून त्यानंतर विशेष विमानाने राजनला दिल्लीत आणण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. काही वेळापूर्वीच इंडोनेशियाच्या पोलिसांनी राजनला भारतीय पथकाच्या ताब्यात दिल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, हे पथक राजनला घेऊन विमानतळाच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, या वृत्ताला दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.
विविध गुन्ह्यात राजन भारताल हवा आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी एक अर्ज सीबीआयने इंडोनेशियन सरकारला सादर केला होता. त्यानंतर राजनैतिक विभागाचे प्रथम सचिव संजीवकुमार अग्रवाल यांनी बाली येथील कोठडीत राजनची सुमारे अर्धा तास भेट घेतली होती. राजनला ताब्यात घेण्यासाठी इंडोनेशियात गेलेल्या पथकात सीबीआयचे अधिकारी, मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीसांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजनविरोधात मुंबई पोलिसात किमान ७५ तर दिल्ली पोलिसात किमान सहा गुन्हे दाखल आहेत. सीबीआय ही इंटरपोलची भारतातील संपर्क संस्था असल्याने त्यांचे अधिकारी पथकात आहेत. नंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. मुंबई पोलिसात त्याच्याविरोधात खुनाचे वीस गुन्हे दाखल असून, दहशतवाद व विध्वंसक कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार चार गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यानुसार वीस गुन्हे दाखल आहेत.