ख्रिस्ती शाळांमध्ये धर्मांतर होत असल्याचा दावा करत या शाळांवरच हल्ले होण्याची घटना मध्य प्रदेशात समोर आली आहे. गेल्या काही काळात अशा घटना वाढल्या असून त्यावर आता भोपाळमधील आर्चबिशप सबॅस्टियन दुराईराज यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना दुराईराज यांनी या हल्ल्यांचा निषेध व्यक्त करताना आमच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याची भूमिका मांडली आहे. तसेच, आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं ते म्हणाले. क्विंटनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यात अशाच प्रकारे गंज बसोडा परिसरात असलेल्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये धर्मांतर होत असल्याचा दावा करत काही संघटनांनी हल्ला चढवला होता. या शाळेत तोडफोड देखील करण्यात आली. यावेळी शाळेत मुलं परीक्षा देत होते. या प्रकारानंतर या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे.
आमची सुरक्षा सरकारची जबाबदारी
यासंदर्भात बोलताना आर्चबिशप सबॅस्टियन दुराईराज यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “समाजविघातक शक्तींपासून ख्रिस्ती मिशनरींचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे”, असं ते म्हणाले. “समाजविघातक व्यक्ती मिशनरीजवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत. आमच्या संस्थांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत”, असं देखील ते म्हणाले.
कोणत्याही चौकशीसाठी तयार
दरम्यान, ख्रिस्ती मिशनरींना विदेशातून निधी येत असल्याच्या मुद्द्यावर देखील त्यांनी आक्षेप घेतला. “निधी कुठून येतो आणि कुठे जातो हे सरकारला माहिती आहे. पण जर सरकारला चौकशी करायची असेल, तर आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत”, असं दुराईराज म्हणाले.
‘जय श्रीराम’ म्हणत जमावाने केली कॅथलिक शाळेची तोडफोड; बजरंग दलाचे चार जण ताब्यात
ख्रिस्ती शाळांमध्ये धर्मांतर होत असल्याच्या दाव्यावर देखील त्यांनी उत्तर दिलं. “जर ख्रिस्ती शाळांमध्ये धर्मांतर होत राहिलं असतं, तर देशात ख्रिश्चनांची संख्या लाखोंमध्ये असती”, असं ते म्हणाले.