पीटीआय, लाहोर
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बुधवारी अनेक चर्चची मोडतोड करण्यात आली. ईशिनदा केल्याच्या आरोपावरून ही मोडतोड झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ‘डॉन डॉट कॉम’ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार फैसलाबादच्या जरानवाला जिल्ह्यातील इसानगरी भागातील सॅल्व्हेशन आर्मी चर्च, युनायटेड प्रेस्बिटेरियन चर्च, अलाईड फाऊंडेशन चर्च आणि शहरूनवाला चर्चची मोडतोड करण्यात आली.
भट्टी म्हणाले की, ईशिनदा केल्याचा आरोप असलेल्या ख्रिश्चन सफाई कामगाराचे घरही पाडण्यात आले. पंजाबचे पोलीस प्रमुख उस्मान अन्वर यांनी सांगितले, की पोलीस आंदोलकांशी बोलणी करत आहेत आणि परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. शांतता समितीसह येथील तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण प्रांतात पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. अन्वर यांनी सांगितले, की या भागाचे सहाय्यक आयुक्त ख्रिश्चन धर्मीय आहेत. येथील नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे त्यांनाही तेथून हटवण्यात आले आहे.
पोलिसांनी मूक प्रेक्षकांची भूमिका घेतली असल्याचा आरोप ख्रिश्चन नेत्यांनी केला आहे. ‘चर्च ऑफ पाकिस्तान’चे अध्यक्ष बिशप आझाद मार्शल यांनी सांगितले, की बायबलचा अपमान करण्यात आला असून ख्रिश्चन धर्मीयांवर पवित्र कुराणाचे उल्लंघन केल्याचा खोटा आरोप लावून त्यांचा छळ करण्यात येत आहे. आम्ही कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेकडे या प्रकरणी न्याय देण्याची आणि त्वरित कारवाईची मागणी करत आहोत.