Chandrayan 3 Mission Team ISRO: भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाणार आहे.तत्पूर्वी आज ISRO ची टीम तिरुपतीच्या चरणी दर्शनासाठी पोहोचली होती. ANI वृत्तसंस्थेने ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये ISRO ची टीम तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेल्याचे दिसत आहे, यावेळी बालाजीच्या चरणी अर्पण करण्यासाठी आणलेल्या एका खास गोष्टीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितल्यानुसार चंद्रयान-३ हे २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशत: अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली असून ती यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. याच मोहिमेत तिरुपती बालाजीचे आशीर्वाद लाभावे यासाठी प्रार्थना करण्यात आली तसेच चांद्रयान ३ ची छोटी प्रतिकृती बालाजीच्या चरणी अर्पण करण्यात आली.
दरम्यान, ‘चंद्रयान-१’ आणि ‘चंद्रयान-२’ यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार होता. मात्र चंद्रयान-३ प्रत्यक्ष चंद्रावर उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. भारताच्या या तिसऱ्या प्रयत्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.