राजकारणात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टिने महत्त्वाचा निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने सोमवारी घेतला. देशातील राजकीय पक्षही माहिती अधिकाऱयाच्या कक्षेत येत असल्याचे माहिती आयोगाच्या आयुक्तांच्या पूर्णपीठाने स्पष्ट केले.
कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्ष यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती देण्यासाठी व्यवस्था करण्याचे निर्देश देशाचे मुख्य माहिती आयुक्त सत्यानंद मिश्रा, माहिती आयुक्त एम. एल. शर्मा आणि अन्नपूर्ण दीक्षित यांनी दिले.
येत्या सहा आठवड्यांत या पक्षांनी माहिती अधिकारी आणि अपिलीय अधिकाऱयाची पक्षाच्या मुख्य कार्यालयात नेमणूक करावी. नागरिकांनी माहिती अधिकारांतर्गत मागवलेली माहिती चार आठवड्यांमध्ये त्यांना द्यावी, असे निर्देश आयोगाने या सहाही पक्षांचे अध्यक्ष आणि सरचिटणीसांना दिले आहेत.
माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींनुसार या पक्षांनी आवश्यक माहिती त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, असेही आयोगाने स्पष्ट केले.

Story img Loader