धूम्रपान करणे काही वेळा कसे जिवावर बेतते याची प्रचिती देणारी एक घटना नुकतीच येथून जवळच असलेल्या कक्कानाड येथे घडली. सत्तर वर्षांच्या एका व्यक्तीने झोपताना सिगरेट पेटवली व तो तसाच झोपी गेला. नंतर तो ज्या चटईवर झोपला होता तिने पेट घेतला. त्यामुळे लागलेल्या आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला. एम. के. बाबू असे मरण पावलेल्या त्या व्यक्तीचे नाव आहे.
काल दुपारी जेवणानंतर बाबू याने सिगरेट पेटवली. सिगरेट पितानाच त्याला झापड आली व तो चटईवर झोपी गेला. नंतर पेटती सिगरेट त्या चटईवर पडली व आग पसरत गेली. त्याच्या जवळच रॉकेलचा डबाही पडलेला होता, त्यामुळे आग वेगाने पसरली. घरातून धूर बाहेर येत असल्याचे पाहून घरातील व शेजारपाजारचे लोक धावले. त्यांनी जखमी अवस्थेत बाबू याला रुग्णालयात नेले, पण त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.