समाजातील वाढत्या गुन्हेगारीला सिनेमा कारणीभूत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे मत प्रसिद्ध चित्रपटनिर्माते महेश भट यांनी व्यक्त केले. ‘फिकी फ्रेम्स’ कार्यक्रमात बोलताना भट यांनी समाजातील गुन्हेगारी आणि सिनेमा याचा जोडण्यात येणाऱया संबंधावर भाष्य केले.
‘सिनेमातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावरील परिसंवादात बोलताना त्यांनी वरील मत मांडले. समाजातील गुन्हेगारीच्या घटनांना सिनेमाच कारणीभूत आहे, असे मला वाटत नाही. आतापर्यंत तसा काही पुरावाही सापडलेला नाही. गुन्हेगारी आणि सिनेमाचा जोडण्यात येणार संबंध हा केवळ गृहितकांवर आधारित आहे. त्यात समाजात जी काही दुष्कृत्ये घडताहेत, त्याला सिनेमाचा जबाबदार असल्याचे समजण्यात येते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ते म्हणाले, सिनेमा माध्यमामुळे प्रेक्षकांना कार्यरत होण्यासाठी प्रोत्साहन मिळते. मात्र, त्यामुळेच गुन्हेगारी वाढते असे म्हणता येणार नाही. ज्यादिवशी आपल्याला तसे स्पष्ट पुरावे सापडतील. आम्ही सिनेमा तयार करणे थांबवू.
अभिनेता कमल हसन, राहूल बोस आणि खासदार जय पांडा हेदेखील या परिसंवादात सहभागी झाले होते. सिनेमांवरून वाद उदभवण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. हा प्रकार केवळ माझ्याविरुद्ध झाला म्हणून नाही, तर इतर कोणाविरुद्ध झाला तरी आपण सगळ्यांनी आवाज उठविला पाहिजे. या प्रकाराविरुद्ध समाजमन जागृत होणे आवश्यक असल्याची अपेक्षा कमन हसन यांनी व्यक्त केली.