हिंदी सिनेमातील अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांची बदली करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या पतीचीही बदली करण्यात आली आहे. चंदीगढ विमानतळावर कंगना रणौत यांना कानशिलात लगावल्यानंतर कुलविंदर कौर यांना निलंबित करण्यात आलं होतं. आता त्यांना नोकरीवरुन परत घेण्यात आलं आहे तसंच त्यांची बदली करण्यात आली आहे. कुलविंदर कौर यांची बंगळुरुला बदली करण्यात आली आहे.
कुलविंदर कौर कंगना यांना कानशिलात लगावल्याने चर्चेत
खासदार कंगना रणौत यांना कानशिलात लगावल्यामुळे कुलविंदर कौर चर्चेत आल्या होत्या. कंगना रणौत यांना का मारलं? याचं कारण सांगताना कुलविंदर कौर यांनी व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्या म्हणाल्या कंगना रणौत म्हणाल्या होत्या की १००-१०० रुपये घेऊन शेतकरी आंदोलनात महिला बसल्या आहेत. त्यावेळी आंदोलनात माझी आईही होती. तसंच कंगना रणौत असंही म्हणाल्या होत्या की या खलिस्तान्यांना इंदिरा गांधींनी मच्छरांप्रमाणे संपवलं होतं. हे बोलल्याने संताप अनावर झाला आणि मी कंगना यांना कानशिलात लगावली. असं या महिलेने म्हटलं होत.
काय होतं हे प्रकरण?
कंगना रणौत या मंडीमधून निवडणूक जिंकून आल्या आहेत. त्यानंतर कंगना लोकसभेत होणाऱ्या कार्यक्रमासाठी चंदीगढ विमानतळावरुन दिल्लीला जात होत्या. त्या चंदीगढ विमानातळावर आल्या तेव्हा कर्टन रुमध्ये कुलविंदर कौर यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर कंगना रणौतही चिडल्या होत्या. त्यांनी या महिला कॉन्स्टेबलशी वाद घातला होता. तसंच त्यांनी या प्रकरणी CISF च्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. ज्यानंतर कुलविंदर कौर यांचं निलंबन करण्यात आलं होतं. आता कुलविंदर कौर यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं आहे. तसंच त्यांची बदली बंगळुरुला करण्यात आली आहे.
हे पण वाचा- खासदार कंगना रणौत आणि चिराग पासवान यांच्या भेटीची पुन्हा चर्चा, संसदेबाहेरील व्हिडीओ व्हायरल
कोण आहेत कुलविंदर कौर?
कंगना रणौत यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या कुलविंदर कौर या सीआयएसफमध्ये कॉन्स्टेबल आहेत. त्या ३५ वर्षीय आहेत. त्यांचं कुटुंब सुल्तानपूर येथील लोधी या ठिकाणी राहतं. मागच्या १५ वर्षांपासून कुलविंदर कौर या सीआयएसएफमध्ये काम करतात. आजवर त्यांच्या कारकिर्दीला कुठलाही कलंक लागलेला नाही.
कुलविंदर कौर या कर्तव्य बजावत असताना कधीही त्यात कसूर करत नाहीत. हे त्यांचं १५ वर्षांचं रेकॉर्ड सांगतं आहे. कुलविंदर कौर या कपूरथला या ठिकाणी त्यांच्या पतीसह राहतात. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांचा भाऊ शेर सिंह हे शेतकरी नेते आहेत. तर किसान मजदूर संघर्ष समितीत ते सचिव आहेत.