मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावण्यात आली होती. सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी चंदीगड विमानतळावर त्यांना थप्पड मारली होती. या प्रकरणावरून गेले काही दिवस प्रचंड चर्चा आहे. दरम्यान, कुलविंदर कौर यांना त्यांच्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नसल्याचा दावा त्यांचा भाऊ शेरसिंग महिवाल यांनी केला आहे. दी प्रिंटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कपूरथला येथील किसान मजदूर संघर्ष समितीचे संघटक सचिव महिवाल म्हणाले की, शेतकरी आंदोलनावरून कंगनाने केलेल्या व्यक्तव्यामुळे त्यांची बहिण नाराज होती. एका व्हिडिओ संदेशात महिवाल म्हणाले की, मी कौर यांची भेट घेतली आणि तिच्याशी या घटनेबद्दल चर्चा केली. तिला या घटनेचा कोणताही पश्चाताप नाही. त्यावेळी पंजाब सरकारने किंवा केंद्राने कंगनावर कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती, असे ते म्हणाले.

हेही वाचा >> कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कॉन्स्टेबलच्या भावाची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी बहीण…”

नेमकं काय घडलं?

६ जून रोजी चंदीगढ विमानतळावरून दिल्लीला जात असताना नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना एका अपमानजनक प्रसंगाचा सामना करावा लागला. विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता संबंधित महिला ही शेतकरी आंदोलनाशी निगडीत होती, असं समजलं. कंगना यांनी पूर्वी केलेल्या वक्तव्याचा राग मनात धरून कॉन्स्टेबलने त्यांच्या थोबाडीत मारली. दरम्यान, याप्रकरणी कुलविंदर कौर या महिलेला निलंबित करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

कोण आहेत कुलविंदर कौर?

कंगना रणौत यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या कुलविंदर कौर या सीआयएसफमध्ये कॉन्स्टेबल आहेत. त्या ३५ वर्षीय आहेत. त्यांचं कुटुंब सुल्तानपूर येथील लोधी या ठिकाणी राहतं. मागच्या १५ वर्षांपासून कुलविंदर कौर या सीआयएसएफमध्ये काम करतात. आजवर त्यांच्या कारकिर्दीला कुठलाही कलंक लागलेला नाही.

कुलविंदर कौर या कर्तव्य बजावत असताना कधीही त्यात कसूर करत नाहीत. हे त्यांचं १५ वर्षांचं रेकॉर्ड सांगतं आहे. कुलविंदर कौर या कपूरथला या ठिकाणी त्यांच्या पतीसह राहतात. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांचा भाऊ शेर सिंह हे शेतकरी नेते आहेत. तर किसान मजदूर संघर्ष समितीत ते सचिव आहेत. या सगळ्या प्रकारानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.