नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर झाले असून त्यावर सर्वपक्षीय सदस्य जोरदार चर्चा करत आहेत. त्याच वेळी एमआयएमचे खासदार असददुद्दीन ओवैसी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडेच विनंती केली की, ”अमित शाह यांना वाचवा…”.त्यांच्या विधानानंतर भाजपाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
ओवैसी म्हणाले की, ”धर्मनिरपेक्षता हा आपल्या देशाचा मूळ गाभा आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मूलभूत अधिकारांचेच उल्लंघन करणारे आहे. या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे भारताचे इस्रायल होईल. गृहमंत्री अमित शाह यांची तुलना हिटलरशी केली जाईल.”
पुढे ओवैसी यांनी स्पष्ट केले की, हे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संमत झाले तर अमित शाह हे भारताचे हिटलर ठरतील. हा नवा इतिहास होण्यापासून अमित शाह यांना वाचवा. त्यांना हिटलर होण्यापासून वाचवा. या देशाला वाचवा. अशी विनंतीही ओवैसी यांनी केली. त्यांच्या विधानानंतर भाजपाचे खासदार चांगलेच भडकले. त्यांना हे शब्द मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी ओवैसी यांचे विधान संसदीय कामकाजातून काढून टाकण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
आणखी वाचा- नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अल्पसंख्याकांविरोधात नाही – अमित शाह
सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून आलेल्या बिगरमुस्लीम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद असलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले. यावर सध्या चर्चा सुरू आहे. काँग्रेससह अनेक विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला आहे. हे विधेयक अल्पसंख्याकांविरोधात नाही, असं दावा शाह यांनी सभागृहात केला आहे.
काँग्रेसचा आक्षेप काय?
काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, “हे विधेयक म्हणजे दुसरे काहीही नसून देशातीलच अल्पसंख्याक लोकांना लक्ष्य केलं जात आहे.” विधेयकाला विरोध करताना खासदार एन.के. प्रेमचंद्रन म्हणाले, “हे विधेयक घटनेच्या मुलभूत संरचनेला तडा देणारे आहे. धर्माच्या आधारावर नागरिकत्वाचा हक्क देणे हे देशाच्या धर्मनिरपेक्षेतेविरूद्ध आहे,”
यावर उत्तर देताना गृहमंत्री शाह म्हणाले, “हे विधेयक शून्य टक्केही देशातील अल्पसंख्याकांविरोधात नाही. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देईल. त्यावेळी सभागृहाचा त्याग करू नका.”